गोवा

रोमटामेळ स्पर्धांत सुयोग शिगमोत्सव मंडळाची दमदार कामगिरी; पटकावला ‘चॅम्पियन्स २०२६’ किताब

शिगमोत्सव २०२६ अंतर्गत झालेल्या रोमटामेळ स्पर्धांमध्ये आडपई-आगापूर येथील सुयोग शिगमोत्सव मंडळाने उल्लेखनीय यश संपादन करत ‘रोमटामेळ चॅम्पियन्स २०२६’ हा मानाचा किताब पटकावला आहे. यंदा राज्यभरातील तब्बल १८ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत सर्वाधिक स्पर्धांमध्ये भाग घेणारे मंडळ म्हणूनही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.


विशेष म्हणजे काही ठिकाणी एकाच दिवशी दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेत मंडळाने सातत्यपूर्ण आणि प्रभावी सादरीकरण केले. कुठ्ठाळी, कळंगुट, कुडचडे, म्हापसा, साखळी, पर्वरी, कुंकळ्ळी, पेडणे आणि फोंडा येथे प्रथम क्रमांक, तर पणजी, मडगाव, डिचोली, वास्को, मांद्रे आणि सांगे येथे द्वितीय क्रमांक मिळवण्यात मंडळाला यश आले. धरबांदोडा येथे तृतीय, तर शिरोडा आणि वाळपई येथे चतुर्थ क्रमांक पटकावत मंडळाने एकूण ९ प्रथम, ६ द्वितीय, १ तृतीय आणि २ चतुर्थ अशी पारितोषिकांची कमाई केली.


गेल्या ११ वर्षांत २०१७, २०१८, २०२०, २०२२, २०२३ आणि २०२४ या वर्षांसह एकूण सात वेळा विजेतेपद पटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी मंडळाने नोंदवली आहे.


मंडळाची ‘शिगम्याची जत’ ही आकर्षक आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणाची खास ओळख ठरली असून प्रेक्षकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या या सादरीकरणाची प्रेरणा घेऊन इतर मंडळांनीही अशा प्रकारच्या जतींचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे.


दरम्यान, पर्यटन विभागाने परीक्षकांसाठी ५० हून अधिक नावे सुचवूनही काही ठिकाणी एकाच परीक्षकांची पुनरावृत्ती झाल्याने मंडळाला अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत मंडळाने हे यश मिळवले.


या यशाचे श्रेय मंडळाचे मार्गदर्शक विघ्नेश गोविंद नाईक यांना दिले जात असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही कामगिरी शक्य झाल्याचे सदस्यांनी सांगितले. तसेच, स्वर्गीय ब्रह्मानंद (भाई) नाईक आणि स्वर्गीय साईश आडपईकर यांच्या स्मृतीस मंडळाने हे यश समर्पित केले आहे.

मंडळातील सर्व सदस्यांचे परिश्रम, समर्पण आणि एकजूट यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत असून सर्व कलाकार, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!