गोवा

बाबू नायक हे गोव्याचे प्रभावशाली नेते होते : एदुआर्द फालेरो

मडगाव – माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी आज दिवंगत अनंत उर्फ बाबू नरसिंह नायक यांच्या जीवनावर आधारित “लोकनायक” या माहितीपटाचा मुहूर्त क्लॅप दिला. बाबू नायक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सदर कार्यक्रम मडगावचे व्यापारी उल्हास वेर्लेकर, एम. के. शेख तसेच नायक कुटुंबीयांच्या उपस्थितीत, पार पडला. हा माहितीपट १९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षात प्रदर्शित करण्यात येणार आहे.


आजचा मुहूर्त सोहळा मडगाव येथील नायक शंखवाळकर कुटुंबियांच्या वडिलोपार्जीत घर श्री दामोदर साल येथे आयोजित करण्यात आल्याने, एका स्मरणीय उपक्रमाची एक महत्त्वपूर्ण सुरुवात झाली.


यावेळी बोलताना एदुआर्द फालेरो यांनी माजी मंत्री अनंत उर्फ बाबू नायक यांच्याशी असलेला आपला सहवास व नाते यांना उजाळा दिला. बाबू नायक हे  गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी सातत्याने लढणारे “गोव्याचे सर्वात प्रभावशाली नेते होते” असे एदुआर्द फालेरो म्हणाले.


माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ राजकीय नेते एम. के. शेख यांनी सांगितले की, हा माहितीपट भविष्यातील पिढ्यांना बाबू नायक यांचे जीवन आणि कार्य समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा मार्गदर्शक ठरेल.


व्यवसायिक उल्हास वेर्लेकर यांनीही बाबू नायक यांच्याशी असलेले आपले निकटचे संबंध आठवले आणि हा माहितीपट तयार करण्याच्या उपक्रमाबद्दल नायक कुटुंबियांचे अभिनंदन केले.


यावेळी उपस्थित कुटुंबीयांमध्ये बाबू नायक यांचे पुत्र पांडुरंग उर्फ भाई, गौरिश आणि विनय; कन्या शोभा मोहन पै वेर्णेकर; सूना संध्या, सीमा आणि मंजुषा; नातू प्रभव आणि अदिल; नातसून सोनल; तसेच पणतू अनंत प्रभव नायक आणि आदी कृपाल नायक यांचा समावेश होता.


हा माहितीपट अनंत उर्फ बाबू नरसिंह नायक जन्मशताब्दी उत्सव समितीमार्फत निर्मित होत असून, दिग्दर्शन किशोर अर्जुन करीत आहेत. या माहितीपटात या महान गोमंतकीय नेत्याचे जीवन आणि कार्य उजागर केले जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!