गोवा

मडगाव रविंद्र भवनकडून गोमंतकीय कलाकारांकडे दुर्लक्ष : विशाल पै काकोडे

मडगाव : रवींद्र भवन, मडगाव येथील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांपेक्षा परराज्यातील कलाकारांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप कलाकार तसेच राज्य सांस्कृतिक विकास समितीचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी केला आहे. गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्वांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अपेक्षित स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात संस्थेला अपयश आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केलेल्या भूमिकेत पै काकोडे यांनी सांगितले की, व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा, चित्रकार लक्ष्मण पै आणि ज्येष्ठ कलावंत के. वैकुंठ यांच्या जन्मशताब्दी वर्षांचा कालावधी नुकताच संपला. या तिन्ही व्यक्तिमत्त्वांचे कला आणि संस्कृती क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांच्या स्मरणार्थ वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी त्यांनी २०२४ पासून सातत्याने केली होती. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला.


रवींद्र भवनतर्फे सध्या आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय जन्मशताब्दी कार्यक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. या कार्यक्रमातील संगीत मैफिलीत गायक संदीप उबाळे आणि शरयू दाते यांच्यासह इतर वादक व सूत्रसंचालक हे गोव्याबाहेरील, म्हणजेच परप्रांतीय असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा कार्यक्रमांसाठी स्थानिक कलाकारांचा अधिक व्यापक सहभाग असायला हवा होता, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.


रवींद्र भवनच्या कार्यक्रमांवरील खर्चाचा मोठा हिस्सा गोव्याबाहेरील कलाकार आणि संस्थांवर होत असल्याचा आरोपही पै काकोडे यांनी केला. स्थानिक सांस्कृतिक क्षेत्राला अधिक संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमांची निवड प्रक्रिया, निधीचा वापर आणि खर्च यामध्ये अधिक पारदर्शकता असावी, अशी मागणी त्यांनी केली. गोव्याच्या सांस्कृतिक संस्थांनी राज्यातील कलाकार आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!