
निरोगी वृद्धत्वासाठी योगाचा संदेश; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभर उपक्रम
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त द योगा इन्स्टिट्यूट, सांताक्रूझ (मुंबई) यांनी देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. सरकारी कार्यालये, संरक्षण दल, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र तसेच डिजिटल माध्यमांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या शेकडो उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
मुंबई, चेन्नई, जयपूर, भुवनेश्वर आदी शहरांमध्ये आयोजित कार्यक्रमांमधून योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, तणावमुक्त जीवनशैली आणि निरोगी वृद्धत्वासाठी योग उपयुक्त असल्याचा संदेश देण्यात आला.
द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी यावेळी सांगितले की, वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी योगाच्या नियमित सरावामुळे शारीरिक क्षमता, मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन दीर्घकाळ टिकवून ठेवता येते.

योग दिनानिमित्त १९ ते २१ जूनदरम्यान ऑनलाइन योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ध्यान, पोषण, तणाव व्यवस्थापन आणि ध्वनी उपचार यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. बांद्रा रिक्लेमेशन येथे आयोजित मेगा योग सत्रात हजारो नागरिक सहभागी झाले. या कार्यक्रमास राज्याचे मंत्री आशिष शेलार तसेच नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस उपस्थित होते.
मरीन ड्राइव्ह येथे आयोजित ‘योग बाय द बे’ या विशेष सूर्योदय योग सत्रातही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, जितिन प्रसाद आणि जयंत चौधरी यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
याशिवाय महाराष्ट्र मंत्रालय, मुंबई विमानतळ, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), भारतीय सैन्य आणि हवाई दलाच्या विविध आस्थापनांमध्ये योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. तसेच महाविद्यालये, शाळा आणि विविध सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्येही विशेष कार्यक्रम राबविण्यात आले.
गेल्या शतकाहून अधिक काळ योग शिक्षण आणि आरोग्य संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या द योगा इन्स्टिट्यूटने योगाच्या प्रसारासाठी देश-विदेशात विविध उपक्रम राबविले आहेत. योग क्षेत्रातील योगदानाबद्दल संस्थेला यापूर्वी पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.








