अर्थमत/ टेक्नॉलॉजीगोवा

गोवासह १० शहरांना एअर इंडियाची ‘ईझी कनेक्ट’ सेवा

वाराणसी : एअर इंडियाने केंद्र सरकारच्या हब-अँड-स्पोक मॉडेलअंतर्गत ‘ईझी कनेक्ट’ या नव्या उड्डाण सेवेची सुरुवात केली असून, लवकरच गोवासह देशातील आणखी दहा शहरांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत पहिले ‘ईझी कनेक्ट’ उड्डाण गुरुवारी वाराणसीहून दिल्लीकडे रवाना झाले. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना आपल्या शहरातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अखंड जोडणी उपलब्ध होणार आहे. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू या प्रमुख हब विमानतळांमार्गे विविध आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानी पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.

एअर इंडियाने पुढील काही महिन्यांत गोवा, अहमदाबाद, अमृतसर, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, मुंबई, पाटणा, वडोदरा आणि विशाखापट्टणम येथे ‘ईझी कनेक्ट’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या सेवेअंतर्गत प्रवाशांना मूळ विमानतळावरच अंतिम गंतव्यस्थानापर्यंत चेक-इन करता येणार असून, इमिग्रेशन प्रक्रियाही प्रस्थानाच्या शहरातच पूर्ण करता येणार आहे. तसेच हब विमानतळावर सामान पुन्हा चेक-इन करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू यांच्या हस्ते वाराणसी येथे या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील लहान आणि मध्यम शहरांना जागतिक विमान वाहतूक जाळ्याशी जोडण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, भारतीय प्रवाशांना परदेशी ट्रान्झिट हबवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी ‘ईझी कनेक्ट’ सेवा विकसित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे देशातील विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ होईल.

या सेवेची बुकिंग एअर इंडियाची वेबसाइट, मोबाईल अॅप, संपर्क केंद्र आणि अधिकृत प्रवास एजंटमार्फत सुरू करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!