गोवा

फर्मागुडीतील आयआयआयटी प्रकल्पाला विरोध करू नये : मुख्यमंत्री

पणजी (प्रतिनिधी) :


फर्मागुडी येथे प्रस्तावित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) प्रकल्पाला विरोध करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. या प्रकल्पामुळे श्री क्षेत्र म्हाळसा देवस्थान परिसराला अथवा स्थानिकांच्या धार्मिक भावना आणि पर्यावरणाला कोणताही धक्का पोहोचणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आयआयआयटी प्रकल्पाबाबत निर्माण झालेला वाद दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी स्थानिक आमदार आणि परिसरातील नागरिकांशी चर्चा केली. राज्याच्या विकासासाठी उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील असे महत्त्वाचे प्रकल्प आवश्यक असल्याचे सांगत, या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.



प्रस्तावित प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी जमीन ही सरकारी मालकीची असून कोणाच्याही खासगी मालमत्तेवर अतिक्रमण केले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच श्री क्षेत्र म्हाळसा देवस्थानाच्या परिसराला कोणताही स्पर्श होणार नसून धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची सरकारकडून पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



विकास आणि पर्यावरण तसेच स्थानिकांच्या भावना यांचा समतोल राखत राज्य सरकार हा प्रकल्प पुढे नेणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता राज्याच्या विकासासाठी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!