पणजी : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टमधील कथित जमीन व्यवहार, बांधकामातील अनियमितता आणि देणगीतील कथित गैरव्यवहारांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या प्रकरणातील खऱ्या दोषींना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेला पक्षाच्या गोवा प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्रीराम मंदिर ट्रस्टची स्थापना आणि विश्वस्तांची नियुक्ती पंतप्रधानांनीच केली असल्याचा दावा करत या कथित गैरव्यवहारांची माहिती त्यांना नव्हती, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे केजरीवाल म्हणाले.
देशभरात प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतरच विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याचा उल्लेख करत, जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, कथित जमीन व्यवहार, देणगीतील गैरव्यवहार आणि बांधकामातील अनियमिततेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अद्याप दर्शन घेतले नसल्याचा दावा करत केजरीवाल यांनी त्यांच्यावरही टीका केली.
पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी २०२१ मधील कथित जमीन व्यवहार, निविदा प्रक्रियेत कमिशनची मागणी, सीसीटीव्ही फुटेज हटविणे आणि देणगीतील कथित गैरव्यवहार यांचा उल्लेख केला. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या आरोपांबाबत पंतप्रधान कार्यालय किंवा भारतीय जनता पक्षाकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.




