
गोवा काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकींसाठी के. सी. वेणुगोपाल गोव्यात
पणजी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी)चे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचे गुरुवारी गोव्यात आगमन झाले. मोपा विमानतळावर गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर, गिरीश चोडणकर, युरी आलेमाव, अल्टोन डी’कोस्टा, एम. के. शेख, प्रतिक्षा खलप, अर्चित नाईक, राजन घाटे, वसीम खान, मंगलदास नाईक, शशांक नार्वेकर, राजेश वेरेकर, असिस नोरोन्हा यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच घोषणाबाजी करत वेणुगोपाल यांचे स्वागत केले.

वेणुगोपाल यांच्या गोवा दौऱ्याला संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. या दौऱ्यात ते पक्षाच्या विविध संघटनात्मक बैठकींना उपस्थित राहणार असून राज्यातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी राजकीय घडामोडी, पक्षबांधणी, बूथस्तरावरील संघटन मजबूत करणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
गोवा काँग्रेसची संघटन अधिक बळकट करण्यावर आणि पक्षाच्या कार्याला गती देण्यावर या दौऱ्यात विशेष भर दिला जाणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.



