
खेकडा पालनासाठी मिळणार ५० टक्के अनुदान
पणजी : राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी गोवा सरकारने खेकडा पालन प्रकल्पांसाठी ५० टक्के अनुदान देणारी नवी योजना सुरू केली आहे. मत्स्यव्यवसाय संचालनालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, खेकडा उत्पादन वाढविणे, पर्यावरणपूरक संवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
योजनेनुसार पेन पद्धतीने १,००० ते ५,००० चौरस मीटर क्षेत्रातील खेकडा पालन प्रकल्प तसेच एक हजार बॉक्स क्षमतेच्या प्रकल्पांसाठी मूळ खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यामुळे व्यावसायिक खेकडा पालनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ पारंपरिक मच्छीमार, वैयक्तिक लाभार्थी, नोंदणीकृत स्वयं-सहाय्यता गट आणि सहकारी संस्थांना घेता येणार आहे. अर्जदार हा किमान १५ वर्षांचा गोव्याचा रहिवासी असावा. तसेच मत्स्यव्यवसाय विभाग किंवा शासनमान्य संस्थेचे खेकडा पालन प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
योजनेअंतर्गत आधार कार्ड, निवासी दाखला, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, प्रकल्पाच्या जागेचा गुगल मॅप आराखडा तसेच आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे सादर करावी लागतील. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल.
गोव्यातील समुद्री खाद्यपदार्थांना देश-विदेशात मोठी मागणी असून खेकड्यांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात नव्या उद्योजकांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक उत्पादनात वाढ होईल, असा सरकारचा विश्वास आहे.




