
बेफामांना लगाम घाला’; राज ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहित भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धक्का बसत असल्याचा आरोप करत, अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
देशात सत्तेचा अहंकार वाढल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून त्याचा परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची सुसंस्कृत आणि संयमी अशी देशभर ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांत ही परंपरा ढासळताना दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
एका आमदाराने आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याने लोकांच्या मृत्यूवर हसल्याचा उल्लेख करत, अशा प्रकारांवर सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अशा घटनांवर मौन बाळगल्याने चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रात संवेदनशील आणि सुसंस्कृत नेतृत्वाची प्रतिमा असल्याचे सांगत, अशा घटनांवर त्यांच्या प्रतिक्रियेचा अभाव निराशाजनक असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. “सत्तेचा माज वाढू देऊ नका आणि बेफाम वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करा,” असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या ३७ वर्षांच्या राजकीय अनुभवाचा उल्लेख करत, पूर्वी कोणत्याही पक्षातील नेत्यांकडून चूक झाल्यास त्यांची गय केली जात नव्हती, असे सांगून ठाकरे यांनी आज स्वकीयांच्या चुकांवर पांघरूण घालण्याची प्रवृत्ती वाढल्याची टीका केली.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून योग्य संदेशाची अपेक्षा असल्याचे नमूद करत, अशा प्रकारांवर कठोर भूमिका घेतल्यास भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्याकडून अपेक्षा आहेत,” अशा शब्दांत त्यांनी पत्राचा शेवट केला.







