देश/जग

७५ वर्षांच्या निवडणूक इतिहासाचा संदर्भग्रंथ प्रकाशित

प्रतिनिधी

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या हस्ते रविवारी नवी दिल्ली येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी “75 Years of Indian Democracy: The Indian Election Story in Facts & Figures (1950–2025)” या संदर्भग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याच कार्यक्रमात Indian Journal of Electoral Studies (IJES) आणि Indian Journal of Socio-Economic Studies (IJSES) या समकक्ष-समीक्षित (Peer Reviewed) त्रैमासिक संशोधन नियतकालिकांच्या पहिल्या अंकांचेही प्रकाशन झाले.

इंडियास्टॅट पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या ग्रंथात १९५० ते २०२५ या कालावधीत भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा, घटनात्मक विकासाचा आणि लोकशाही संस्थांच्या उत्क्रांतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा तसेच राज्य विधानसभांच्या निवडणुकांची वर्षनिहाय माहिती, सांख्यिकीय तक्ते, कालरेषा, आलेख आणि कार्यकाळाच्या नोंदींचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे.

या ग्रंथात जानेवारी ते जून २०२६ या कालावधीतील महत्त्वाच्या निवडणूक आणि राजकीय घडामोडींचाही परिशिष्टाद्वारे समावेश करण्यात आल्याने तो भारतीय लोकशाहीच्या अभ्यासासाठी अद्ययावत संदर्भग्रंथ ठरतो.

Indian Journal of Electoral Studies हे नियतकालिक निवडणूक व्यवस्था, लोकशाही संस्था, निवडणूक प्रशासन, मतदानाची प्रवृत्ती, राजकीय सहभाग आणि निवडणूक सुधारणांवरील संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देते. तर Indian Journal of Socio-Economic Studies हे अर्थव्यवस्था, समाज, सार्वजनिक धोरण, शासन व्यवस्था आणि शाश्वत विकास या विषयांवरील पुराव्यानिष्ठ संशोधनाला चालना देणारे नियतकालिक आहे.

यावेळी बोलताना हरिवंश यांनी भारताच्या लोकशाही प्रवासाचे दस्तावेजीकरण करणाऱ्या अशा संशोधनपर उपक्रमांचे कौतुक केले. सात दशकांहून अधिक काळातील निवडणूक माहिती एका ग्रंथात उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असून, संशोधक, धोरणकर्ते आणि भावी पिढ्यांसाठी तो मौल्यवान संदर्भ ठरेल, असे त्यांनी सांगितले.

इंडियास्टॅट पब्लिकेशन्सचे संचालक तसेच ग्रंथ आणि दोन्ही नियतकालिकांचे संपादक डॉ. आर. के. ठुकराल यांनी विश्वसनीय निवडणूक आणि सामाजिक-आर्थिक माहिती संशोधक, शैक्षणिक संस्था, धोरणकर्ते आणि सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या संस्थेच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. तसेच प्रकाशन समारंभासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आणि शैक्षणिक संशोधनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी हरिवंश यांचे आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!