गोवा

कलम ३९अ रद्द करण्यासाठी ‘इनफ इज इनफ’चा १७ रोजी मोर्चा

पणजी : नगरनियोजन कायद्यातील कलम ३९अ रद्द करण्याच्या मागणीसाठी ‘इनफ इज इनफ’तर्फे शुक्रवारी (१७ जुलै) पणजी येथील नगरनियोजन खात्याच्या कार्यालयासमोर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेनंतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन मुख्य नगरनियोजकांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती देविदास आमोणकर यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना आमोणकर म्हणाले की, सभा सकाळी १० वाजता सुरू होणार असून ती शांततापूर्ण आणि सर्व कायद्यांचे पालन करून घेण्यात येईल. यावेळी क्लॉड आल्वारेस आणि ‘इनफ इज इनफ’चे पदाधिकारी आपली भूमिका मांडतील. त्यानंतर शिष्टमंडळ मुख्य नगरनियोजकांची भेट घेऊन निवेदन देणार असून, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला जाईल. या सभेसाठी भाजपसह सर्व पक्षांच्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आमोणकर यांनी स्पष्ट केले की, संघटनेचा विकासाला विरोध नसून शाश्वत विकासाला पाठिंबा आहे. मात्र विकासाच्या नावाखाली जमिनींचे रूपांतर करून पर्यावरणाची हानी होणे स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी नमूद केले. कलम ३९अमुळे गोव्याच्या पर्यावरणाला आणि अस्मितेला धोका निर्माण झाला असून हे कलम रद्द करण्यासाठी यापूर्वी राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडेही निवेदने सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोविंद शिरोडकर म्हणाले की, या चळवळीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या सहा महिन्यांत सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती बैठका घेण्यात आल्या आहेत. सरकारने कलम ३९अबाबत भूमिका स्पष्ट करावी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!