देश/जग

राहुल, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांचे नेते पोलिसांच्या ताब्यात

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचे आंदोलन

नवी दिल्ली : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींसह प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस अत्याचाराबाबत उत्तर मागण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे सांगितले. संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतर केंद्र सरकार जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि अन्य काँग्रेस नेते पंतप्रधानांच्या ७, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानाबाहेर बसून घोषणाबाजी करत होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना तेथून हटवत ताब्यात घेतले. काँग्रेसने या कारवाईचा निषेध केला असून, पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलनावर बळाचा वापर केल्याचा आरोप केला आहे.

या आंदोलनात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी आणि या प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटी, प्रश्नपत्रिका फुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!