
अबा दे फारिया रस्त्याचे जतन करा – प्रभव नायक
मडगाव : अब्बे फारिया यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना, मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगावच्या ऐतिहासिक अबादे फारिया रस्त्याचे हेरीटेज स्ट्रीट (वारसा पथ) म्हणून जतन व संवर्धन करण्याची सरकारकडे पुन्हा मागणी केली.
नायक यांनी आठवण करून दिली की, गेल्या वर्षीही त्यांनी या ऐतिहासिक रस्त्याच्या जतनासाठी सरकारकडे आवाहन केले होते; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. पूर्वी घातलेले डांबराचे थर न काढताच वारंवार डांबरीकरण केल्याने रस्त्याची पातळी वाढत चालली असून, त्यामुळे या परिसरातील ऐतिहासिक घरे पाणी साचणे आणि पुराच्या धोक्याला अधिकाधिक सामोरी जात आहेत.
मडगाव नगरपालिका इमारतीच्या आसपासच्या रस्त्यांचीही त्यांनी दुरवस्था निदर्शनास आणून दिली. काही ठिकाणी पदपथ रस्त्याच्या पातळीखाली गेले आहेत, तर वाहतूक बेटांजवळ काही पदपथ पूर्णपणे गायब झाले आहेत, ज्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.
अबादे फारिया रोड आणि नगरपालिका इमारत परिसरातील रस्त्यांची पातळी, निचरा व्यवस्था, पदपथ आणि ऐतिहासिक वास्तूंचे सर्वंकष परीक्षण करण्याची मागणी नायक यांनी सरकारकडे केली आहे.
“दरवर्षी रस्त्याची पातळी वाढवत मडगावचा वारसा जतन करता येणार नाही. आपल्या ऐतिहासिक रस्त्यांचे संरक्षण, योग्य पदपथ व निचरा व्यवस्था आणि मडगावच्या वारशाचे संवर्धन करण्यासाठी सरकारने आता तातडीने कृती करावी,” अशी मागणी मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.







