देश/जग

जंतर-मंतर आता आंदोलनाचे ठिकाण नाही

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील आंदोलन आणि निदर्शनांसाठीचे प्रमुख ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंतर-मंतरला अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलनांसाठी तीन नवीन स्थळे निश्चित केली असून, त्यामध्ये रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी ग्राउंडचा समावेश आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी ११ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला.


केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकांना आंदोलन आणि निदर्शने करण्यासाठी पर्यायी स्थळे निश्चित करण्याच्या उद्देशाने एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींच्या आधारे जंतर-मंतरला आंदोलनस्थळ म्हणून दिलेली मान्यता रद्द करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


नव्या स्थळांसाठी स्वतंत्र नियमावली

रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड या तीन ठिकाणी आंदोलन आणि निदर्शने आयोजित करता येणार आहेत. या स्थळांवरील आंदोलनांसाठी सुधारित आणि सविस्तर मानक कार्यपद्धती (एसओपी) स्वतंत्रपणे जारी करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीच्या आंदोलनविषयक आदेशात अंशतः बदल करून हा निर्णय घेण्यात आला आहे.


राजकीय आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसह कॉक्रोच जनता पार्टी या राजकीय गटाने दिल्लीत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरूनही राजकीय वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असताना जंतर-मंतरबाबतचा निर्णय घेण्यात आला.

जंतर-मंतर हे अनेक दशकांपासून राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विविध आंदोलनकर्त्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण राहिले आहे. त्यामुळे हे स्थळ आंदोलनांच्या अधिकृत यादीतून वगळण्याच्या निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!