google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी मोफत लसीकरण

सातारा (महेश पवार):

महिलामध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये दुसऱ्या क्रमाकावरील असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (सर्व्हायकल कॅन्सर) प्रमाण एचपीव्ही (हयुमन पॅपिलोमा व्हायरस) या प्रतिबंधात्मक लशीमुळे लक्षणीयरीत्या घटले आहे. त्यामुळे भारतातही या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एकमेव कर्करोग आहे. या लसीचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी साताऱ्यात दि. २९, ३० व ३१ जुलै रोजी आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या सहकार्याने ८ ते १८ वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

२००८ मध्ये सर्वप्रथम इंग्लडमध्ये एचपीव्ही लस देण्यास सुरुवात झाली. या लसीची परिणामकारकता अभ्यासणाऱ्या पहिल्या जागतिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. लसीकरणानंतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णामध्ये सुमारे ९० टक्के घट झाली आहे. १४ ते १६ वर्ष वयोगटातील मुलीमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगामध्ये ६२ टक्के, तर १६ ते १८ वर्ष वयोगटामध्ये सुमारे ३४ टक्के एवढी घट झाली आहे. त्यामुळे या लसीची परिणामकारकता स्पष्ट झाली आहे.

जगातील सुमारे तीन लाख महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे जागतिक आकडेवारीतून समोर येते. गर्भाशय मुखाचा म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर हा ९९ टक्के वेळा ह्युमन पॅपिलोमा या विषाणुमुळे होतो. एचपीव्ही लसीमुळे विषाणूचा सपूर्ण नाश होत नाही, मात्र त्यामार्फत होणारा संसर्ग जवळजवळ नष्ट होतो, असे निरिक्षण या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत शंभरपेक्षा अधिक देशांनी एचपीव्ही लसीचा वापर सुरू केला आहे. एचपीव्ही विषाणूचा संसर्ग झालेल्या महिलामध्ये संसर्गानंतर दीर्घकाळानतरही गर्भाशय मुखाच्या कर्करोगांची लक्षणे दिसण्याची शक्यता असते.

भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. गर्भाशय मुखाच्या सर्व प्रकारच्या कर्करोगासाठी एचपीव्ही विषाणू कारणीभूत आहे. एचपीव्ही संसर्ग हा लैंगिक संबंधामधून स्त्री-पुरुषामध्ये पसरण्याची शक्यता असते. कमी रोगप्रतिकार शक्ती, तंबाखूचे अतिसेवन किवा धूम्रपान, असंतुलित आहार, मांसाचे सेवन, मद्यपान, लैगिक संबंधातून होणारे संसर्ग, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा असे जीवनशैलीशी निगडित बदलही या कर्करोगाच्या तीव्रतेला कारणीभूत ठरतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येते.

एचपीव्ही लसीकरणामुळे जागतिक स्तरावरील गर्भाशय मुखाच्या कर्करोगात घट झाली आहे, हे वास्तव आहे. विशेषतः सरकारी रुग्णालयामध्ये अशा रुग्ण महिला मोठया प्रमाणावर पाहायला मिळतात. लसीची किंमत हा भारतातील चित्र बदलण्यामागील मुख्य अडथळा आहे. त्यामुळे एचपीव्ही लसीकरणाबाबत देशाचे धोरण तयार होणे आणि त्याची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. हि लस सुमारे ४ हजार रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.

मात्र सर्वसामान्य लोकांना न परवडणारी असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते. एच पी व्ही (विषाणू) चा धोका पाहता पुढील आयुष्यात गर्भाशयमुख कॅन्सर उदभवू नये म्हणून कर्तव्य सोशल ग्रुप सातारा, आधार चॅरिटेबल फडिशन, स्त्रीरोगतज्ज्ञ असोसिएशन सातारा आणि कैंसर पेशन्ट एड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हि लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिनांक २९, ३०, ३१ जुलै रोजी आधार आई सी यु अँड मल्टीस्पेसिऍलिटी हॉस्पिटल, सदर बाजार सातारा येथे मोफत एच पी व्ही लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्यांना स्वच्छेने हि लस घ्यावयाची असेल त्या ८ ते १८ वयोगटातील मुलींनी आई- वडील, पालकांची संमती असलेला फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. इच्छुकांनी सदरचे फॉर्म भरून या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. फॉर्म आणि नाव नोंदणीसाठी ९००४५३७८७८, ९८५०६०९४२४, ९४२३०३२०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!