‘…ते तर ‘हिज मास्टर्स वॉयस’
कुंकळ्ळी :
गोवा संपूर्ण यात्रा समाप्ती कार्यक्रमात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या भाषण भाजप सरकारच्या वर्मावर बसले. भाजपचे आयात केलेले प्रवक्ते यतीश नायक यांची मजबुरी मी समजू शकतो. ते बिचारे “हिज मास्टर्स वॉयस” आहेत असा टोला काँग्रेसचे कुंकळ्ळी गट अध्यक्ष आसिज नोरोन्हा यांनी हाणला आहे.
गोवा संपुर्ण यात्रा समारोप सोहळ्यातील युरी आलेमाव यांचे भाषणा निराधार व बिनबूडाचे असल्याचे भाजपच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, आसिज नोरोन्हा यांनी यतीश नायक हे ‘राजकीय पक्षांतर बहाद्दर’ असल्याचे सांगून त्यांची खिल्ली उडवत त्यांना फटकारले.
विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी आपल्या भाषणात म्हादई, बेरोजगारी, अन्नधान्याची नासाडी आणि चोरी, सांगे येथिल आयआयटी प्रकल्प आणि तीन रेषीय प्रकल्प रद्द करणे, गोव्यातील दयनीय रस्त्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात हे प्रमुख मुद्दे उपस्थित केले आणि गोव्याच्या राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची आणि उपाय शोधण्याची विनंती केली. विरोधी पक्षनेत्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले, असे आसिज नोरोन्हा यांनी सांगितले.
आमचे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्यपालांच्या गोवा यात्रेच्या समारोप कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अनुपस्थितीचा निषेध केला. त्यांच्या गैरहजेरीने गोमंतकीयांच्या समस्यांबाबत भाजपची असंवेदनशीलता उघड झाली. भाजपचे “पार्टी अँड पॉवर फर्स्ट’ वृत्ती परत एकदा स्पष्ट झाली. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापेक्षा स्थानिक एमसीडी निवडणुकीत भाजप उमेदवारासाठी दिल्लीत प्रचार करणे पसंत केले, असे आसिज नोरोन्हा यांनी नमूद केले.
गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी त्यांच्या शासकीय अधिकाराने राज्याचा दौरा केला. सदर दौरा हा खासगी नव्हता. त्यांना विविध व्यक्ती, संघटना, गट आणि संस्थांकडून गोव्याच्या समस्यांवर प्रकाश टाकणारी निवेदने देण्यात आली. भाजपचे प्रवक्ते यतीश नायक यांनी लक्षात ठेवावे की, राज्यपालांच्या यात्रेने एक प्रकारे भाजप सरकारची गेल्या दहा वर्षातील उदासीनता आणि सुस्तपणा उघड केला आहे, असे आसिज नोरोन्हा म्हणाले.
गोवा लोकायुक्तांनी भाजप सरकारला दिलेल्या २१ भ्रष्टाचार प्रमाणपत्रांवर भाजपच्या प्रवक्त्यांनी बोलावे, त्यांनी सार्वजनीक बांधकाम खाते आणि पोलिस खात्यातील नोकरभरती घोटाळ्यावर बोलले पाहिजे, त्यांनी समाज कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत आणि खलाशांना पेन्शन देण्यास होत असलेल्या विलंबाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कुंकळ्ळी गट कॉंग्रेस अध्यक्ष आसिज नोरोन्हा यांनी केली आहे.