‘मंत्री महोदयांनी, स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामाची पदयात्रा करावी’
पणजी :
आम्ही स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भ्रष्टाचार आणि निकृष्ट काम उघड केल्याने, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांना या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी राजधानीत येण्यास भाग पाडले असे सांगून काँग्रेसने सोमवारी भाजप नेत्यांना या निकृष्ट कामाची माहिती घेण्यासाठी पणजीत ‘पदयात्रा’ काढण्याचा सल्ला दिला.
काँग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्मार्ट सिटीच्या कामामुळे लोकांना कसे त्रास होत आहेत, हे केंद्रीय मंत्र्यांनी येवून बघावे असे म्हटले.
स्मार्ट सिटीच्या कामातील भ्रष्टाचाराविरोधातील त्यांनी आंदोलने केल्यामुळे केंद्र सरकारला त्यांच्या मंत्र्याला हे तपासण्यासाठी पाठवणे भाग पडले याचा आपल्याला आनंद होत असल्याचे पणजीकर म्हणाले.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके, एल्विस गोम्स, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, पणजी महिला गटअध्यक्ष लविनिया डिकॉस्ता यावेळी उपस्थित होते.
“आम्ही या कामातील घोटाळे आणि गैरव्यवस्थापन उघड केल्यामुळे केंद्रीय शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी स्मार्ट सिटी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आले असल्याचे आम्हाला समजले आहे. मला आशा आहे की ते केवळ वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून बैठका घेणार नाहीत, तर बाहेर येवून खरा आढावा घेण्यासाठी पणजी शहरात ‘पदयात्रा’ काढतील,” असे पणजीकर म्हणाले.
“आम्हाला आनंद आहे की ते आढावा घेण्यासाठी आले आहेत आणि लोकांचे दुःख कमी करण्यासाठी काहीतरी करेल. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, इतर मंत्री, अधिकारी यांच्यासमवेत त्यांनी ‘पदयात्रा’ काढली तर, ही कामे करताना झालेला भ्रष्टाचार आणि दर्जाहीन कामांची त्यांना कल्पना येईल,‘ असे पणजीकर म्हणाले.
पणजी स्मार्ट सिटी प्रकल्प हे मिशन टोटल कमिशन बनले आहे, हे काँग्रेस पक्षाने उघड केले आहे, असे ते म्हणाले. या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला आहे आणि यापुढेही तो उघड करू, असे ते म्हणाले.
एल्विस गोम्स म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या कामांचे कोणतेही नियोजन नाही त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर, याचा फटका नागरिकांना बसणार आहे.
‘‘करदात्यांच्या पैशाचा वापर विकासाच्या कामासाठी केला पाहिजे. पण इथे असे काहीही दिसत नाही. ही कामे करताना कंत्राटदारांना काय करायचे आहे, याचे भान राहत नाही. केंद्रीय मंत्र्यांनी घरोघरी जाऊन त्यांना सीवरेजच्या कामामुळे कसे त्रास होत आहे हे विचारावे,” असे गोम्स म्हणाले.
ते म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपासून नाल्याचे काम सुरू आहे, मात्र ते पूर्ण होत नाही. “मुळात त्यांना योग्य नियोजन माहीत नाही. या संपूर्ण कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
केंद्रीय मंत्र्यांनी पणजी शहराला भेट देऊन स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करावी, असे आवाहन विजय भिके यांनी केले. “जर त्यांनी इते पदयात्रा काढली नाही नाही तर ‘टोटल कमिशनची बॅग’ अदलाबदल झाल्याचे स्पष्ट होईल,” असे ते म्हणाले.
लव्हिनिया डिकॉस्ता म्हणाल्या की, स्मार्ट सिटीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. “अनेक ठिकाणी सांडपाणी दिसत आहे. मला भीती वाटते की यामुळे आणखी एक साथीचा रोग पसरू शकतो. ही दयनीय परिस्थिती आहे,” असे ती म्हणाली.