‘गोव्यात उभारण्यात यावा मोहन रानडे यांचा पुतळा’
पणजी :
राज्यात आणि देशातदेखील विविध राजकीय पुढारी आणि अन्य विविध क्षेत्रातील नेत्यांचे मोठेमोठे पुतळे उभारले जात असताना, ज्यांनी या राज्याच्या मुक्तीसाठी प्रचंड हालअपेष्ठा भोगल्या, तुरुंगवास भोगला त्या मोहन रानडे यांच्यासारख्या निरपेक्ष, निस्वार्थी स्वतंत्रसैनिकाचा एकही पुतळा या राज्यात नाही हि खेदाची बाब आहे. गोव्यातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी सरकारने याबाबतीत पुढाकार घेऊन मोहन रानडे यांचा पुतळा येणाऱ्या काळात उभारणे नितांत गरजेचे आहे, अशी अपेक्षा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध लेखिका, सिनेनाट्य निर्मात्या ज्योती कुंकळकर दिग्दर्शित आणि निर्मित ‘गोंय स्वातंत्र्याचे होमखण’ या माहितीपटाच्या डिजिटल कॉपीचे अनौपचारिक अनावरण केल्यांनतर त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमात मेधा पाटकर आणि वामन प्रभू यांच्यासह माहितीपटाच्या निर्मात्या ज्योती कुंकळकर, सहनिर्मात्या संपदा कुंकळकर, विलास प्रभू यांची उपस्थिती होती.
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर झटलेल्या आणि गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्ती मिळाल्यानंतरदेखील पुढील आठ वर्षे पोर्तुगीजांचा तुरुंगवास भोगलेले ज्येष्ठ स्वतंत्रसैनिक मोहन रानडे यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन सरकारकडून अद्याप झालेले नाही, हि खेदाची बाब आहे. याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच पुढाकार घेऊन रानडे याना त्यांचे श्रेय देणे गरजेचे आहे, असेही यावेळी मेधा पाटकर यांनी नमूद केले.
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे. यामध्ये देशभरातील लहानथोरांचा सन्मान्य समावेश आहे. या सगळ्यांबद्दल आपल्याला माहिती असणे कदाचित शक्य होणार नाही, त्यामुळे या सगळ्यांची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘गोंय स्वातंत्र्याचे होमखण’ या माहितीपटाचे आपण विशेष स्वागत केले पाहिजे, असेही यावेळी पाटकर यांनी आवर्जून सांगितले. अशा पद्धतीच्या विषयावर वेळीच तपशीलवार माहितीपट निर्माण केल्याबद्दल मेधा पाटकर यांनी कुंकळकर मायलेकींचे आवर्जून कौतुकदेखील यावेळी केले.