Purple Fest 2024 : पणजी, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-२०२४’चे यजमानपद भूषविण्यास गोवा राज्य सज्ज झाले आहे. यंदापासून हा महोत्सव आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणून आयोजित केला जात असून भारतासह विविध देशांतील आठ हजारहून अधिक प्रतिनिधींच्या सहभागाची अपेक्षा आहे.
पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या या Purple Fest महोत्सवाच्या माध्यमातून गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे कायमस्वरूपी पाठीचा कणा उपचार केंद्र आणि दिव्यांगांसाठीच्या उपकरणाच्या युनिटचा प्रारंभ यासारखे उपक्रम सादर होणार आहेत. ८ ते १३ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे.
याबाबत राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, “पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या व्यक्तींना आजवर उपचारांसाठी राज्याबाहेर जावे लागत असते आणि सुरवातीच्या उपचारांनतर राज्यात परतल्यानंतर नियमित उपचार – व सुरक्षाविषयक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत असे.
राज्यातील ही कमतरता दूर करण्याचे प्रयत्न आम्ही केले आहेत. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात कायमस्वरूपी दिव्यांगजनासाठीच्या उपकरणाचा कक्ष सुरू होत असून यामुळे अशा रुग्णांना कृत्रिम अवयव (हात, पाय) उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे व अशा उपचारांसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे.”
गोव्यात जनजागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आम्ही गोव्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली आहे.
उदाहरणार्थ, दिव्यांगजन राज्यांतर्गत प्रवासासाठी कदंबच्या बसचा अवलंब करत असतात, त्यामुळे आम्ही कंदब परिवहन महामंडळाचे १२०० वाहक आणि चालक यांच्यासाठी जागृती उपक्रम आयोजित केले आहेत.”
Purple Fest