IFFI : गोमंतकीय सिनेमांचा इफ्फित डंका
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पुढाकारामुळे २००४ साली गोव्यामध्ये इफ्फिला आपला कायमचा पत्ता मिळाला, आणि भारताचा अधिकृत आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव आता ‘गोवा सिनेमहोत्सव’ म्हणून ओळखला जाऊ लागला. असे असले तरी, गोव्यामध्ये एकूणच सिनेसंस्कृती आणि सिनेउद्योजकता तेव्हा एवढी भरात आलेली नव्हती. वर्षागणिक एखाद-दोन कोंकणी सिनेमे तयार होत असत, आणि विविध सिनेमहोत्सवात गाजत- वाजत असत. पण आता इफ्फिच्या माध्यमातून जेव्हा जगभरातील सिनेमा आपल्या घरात आल्यामुळे आपल्या घरातील सिनेमाही जगभरात जाणे गरजेचे होते. आणि यासाठी काही गोमंतकीय उद्यमशील सिनेकर्मीनी पुढाकार घेऊन आपले म्हणणे सरकारकडे मांडले. आणि तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना हि बाब पटल्यामुळे त्यांनी ती विनाविलंब मान्य करत इफ्फिमध्ये गोमंतकीय सिनेमांचा ‘गोवन स्टोरीज’ हा स्वतंत्र विभाग सुरु केला.
या विभागात प्रामुख्याने गोमंतकीय निर्मात्यांचे, गोव्यात निर्मित झालेलेच सिनेमे आणि लघुपट निवडले जातील, हे सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे इथल्या सिनेकर्मीमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. कारण या विभागाच्या माध्यमातून आता त्यांचे कोंकणी, मराठी सिनेमे किंवा लघुपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार होता.सुरुवातीला थोडी अडखळत सुरु झालेला गोवन स्टोरीज विभाग आता गेल्या दोनेक वर्षांपासून आशय-विषय आणि मांडणीच्या दृष्टीने अधिकच तयार झालेला दिसतो आहे. सुरुवातीच्या काळात या विभागात एकूणच ४/५ सिनेमे -लघुपट येत असत. त्यातील दोन-चार लघुपट- सिनेमे निवडले जात असत. पण या वर्षी तर तब्बल २८ लघुपट-सिनेमांच्या प्रवेशिका गोवन स्टोरीज विभागासाठी आलेल्या होत्या. जो एकूणच गोमंतकीय सिनेक्षेत्रांतील विक्रम आहे. कारण या २८ प्रवेशिका अत्यंत वेगवेगळ्या वयोगटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या लघुपटांच्या- सिनेमांच्या होत्या.
कमल स्वरूप यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने यातून दर्जेदार १४ लघुपट- ,माहितीपटांची इफ्फितील गोवन स्टोरीज विभागासाठी निवड केली. यावर्षी या विभागावाची सुरुवातच तरुण ऍनिमेटर आणि नवोदित दिग्दर्शिका नित्या नावेलकर हिच्या ‘खारवन’ या माहितीपट आणि सक्रिय पत्रकारितेतून सिनेनिर्मितीकडे वळलेल्या लेखक- दिग्दर्शक किशोर अर्जुन याच्या ‘एक कप च्या..!’ या लघुपटासोबत केली. या दोन्हींना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. ‘एक कप च्या..!’ या लघुपटाने गोमंतकीय तसेच बाहेरच्या रसिकांना विशेष चर्चा करण्यास भाग पाडले. घरातील स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल मोजक्या शब्दांत बोलणारा हा लघुपट मोनोक्रॉम म्हणजेच कृष्णधवल रंगात होता. आणि त्यामुळे या लघुपटाचा विषय अधिक तीव्रपणे पोहोचत असल्याचे रसिकांनी सांगितले. यासह इतरही कोंकणी लघुपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.