अमित शहांच्या वक्तव्यावर मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांकडे बोट
गोव्याच्या संमतीनेच म्हादईचे पाणी कर्नाटकाला देण्याचा निर्णय झाला आहे. या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावरून राज्यातील नागरिक आक्रमक झाले असून असंतोष वाढला आहे. याबाबत मंत्र्यांना विचारणा केली असता ते माध्यमांना चुकवण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवणे सुरू आहे.
कर्नाटकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या संमतीनेच म्हादईचे पाणी उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय झाला असून यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना हे पाणी मिळेल, असे जाहीर केले.
दरम्यान, यामुळे लोकांचा पारा अधिकच चढलेला दिसतो. माध्यम प्रतिनिधींनी राज्यातील मंत्र्यांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे येऊ लागली आहेत.
आज सकाळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यटन भवनमध्ये आले असता त्यांना पत्रकारांनी विचारण्याचा प्रयत्न केला असता ते दुसऱ्या दरवाजातून निघून गेले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आज कॅन्सर दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी ‘याबाबत सरकारचे मत मुख्यमंत्री सावंत व्यक्त करतील, तुम्ही त्यांनाच विचारा’ असे सांगून विषय टोलवला.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असे म्हटले.
तर जलस्त्रोत मंत्री शिरोडकर यांनी “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याबाबत मी असहमत आहे. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडत असून न्यायालय आपल्याला योग्य तो न्याय देईल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही कर्नाटकाला पाणी वळवून देणार नाही.” असे सांगितले.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी ‘आमची न्यायालयीन बाजू भक्कम आहे’, असा दावा केला आहे.