
पणजी : १४ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणाऱ्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या १० व्या, ११ व्या आणि १२ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी गोवा सज्ज होत असताना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महोत्सवाच्या नवीन अधिकृत लोगोचे अनावरण केले. त्यांनी ते राज्याच्या सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक भावनेचे दर्शन घडवणारे प्रतीक असल्याचे यावेळी नमूद केले.
या लोगोमध्ये प्रामुख्याने दोन प्रतीकांचा उपयोग केला आहे. पैकी एक म्हणजे, कॅमेरा शटर, जो सिनेमाची अचूकता आणि कलात्मकता दर्शवितो आणि दुसरा म्हणजे शिंपले कवच, जो गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे खोलवर प्रतिनिधित्व करतो, जो वाढ, संरक्षण, सातत्य आणि जीवनचक्र दर्शवितो. या लोगोच्या माध्यमातून “सेलिब्रेटिंग ७५ इयर्स ऑफ गोवन सिनेमा” मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि, “हा राज्य चित्रपट महोत्सव कोंकणी आणि मराठी भाषेतील सिनेमांसाठी आहे. यात सुमारे २४ चित्रपटांनी यात भाग घेतला आहे. आणि गोव्यात होणाऱ्या इफ्फि महोत्सवाऐवढाच प्रतिसाद राज्य चित्रपट महोत्सवालादेखील मिळेल, आणि हा लोगो केवळ गोव्यातील चित्रपट बंधुत्वाला सहकार्य देतानाच गोव्याच्या समृद्ध चित्रपटसृष्टीचे एक चिरस्थायी प्रतीक बनेल. चित्रपट समुदायातील प्रतिनिधी, विद्यार्थी, उत्साही आणि मीडिया व्यावसायिकांना महोत्सवासाठी प्रेरित करेल. असा विश्वास आहे.’
गोवा राज्य माहिती आणि प्रसिद्धी विभागाने आयोजित केलेल्या आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) द्वारे राबविण्यात येणाऱ्या या महोत्सवाला ESG च्या “48 तासांच्या लघुपट निर्मिती स्पर्धे” साठी 43 नोंदणीं झाली आहे.