अर्थमत/ टेक्नॉलॉजी

लंका प्रीमियर लीगला २० दशलक्ष डॉलरचे बळ

कोलंबो : लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) सहाव्या हंगामाला १० जुलैपासून सुरुवात होत असताना स्पर्धेला मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. एलपीएलचे प्रमोटर ‘इनोव्हेटिव्ह प्रॉडक्शन ग्रुप’ (आयपीजी) यांनी अमेरिकास्थित ‘फ्लॅश स्पोर्ट्स अँड मीडिया’सोबत धोरणात्मक विलीनीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली. या व्यवहारानंतर आयपीजीच्या नियंत्रणाखालील सर्व टी-२० क्रिकेट लीगचे व्यावसायिक हक्क नॅसडॅक-सूचीबद्ध ‘युग्रो’ प्लॅटफॉर्मच्या छत्राखाली आले आहेत.


या नव्या भागीदारीच्या माध्यमातून आयपीजी पुढील दोन वर्षांत एलपीएलच्या विकासासाठी २० दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. लीगचा जागतिक विस्तार, डिजिटल प्रेक्षकवर्ग वाढवणे, प्रसारण दर्जात सुधारणा आणि व्यावसायिक उत्पन्नवाढ यांवर भर दिला जाणार आहे.


एलपीएलची बौद्धिक मालमत्ता (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी) श्रीलंका क्रिकेटकडेच राहणार असली तरी तिचे विशेष व्यावसायिक आणि मीडिया हक्क आयपीजीकडे कायम राहतील. नव्या कॉर्पोरेट संरचनेमुळे लीगला संस्थात्मक भांडवल, अधिक पारदर्शकता आणि जागतिक स्तरावरील विस्तारासाठी आवश्यक आर्थिक क्षमता उपलब्ध होणार आहे.

आयपीजी ग्लोबलचे संस्थापक व अध्यक्ष अनिल मोहन यांनी सांगितले की, “सार्वजनिक आणि नियमबद्ध कॉर्पोरेट संरचनेत प्रवेश केल्याने एलपीएलचा जबाबदारीने विस्तार करण्याची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. वाढीव भांडवल आणि कडक प्रशासकीय नियमांमुळे फ्रँचायझींचे दीर्घकालीन मूल्य वाढविण्यावर भर देता येईल.”


आयपीजीने यापूर्वी मलेशिया आणि झिम्बाब्वेमधील टी-२० लीग विकसित करण्यासाठी दीर्घकालीन विशेष करार केले आहेत. या नव्या गुंतवणुकीच्या मदतीने त्या बाजारपेठांमध्येही विस्ताराची गती वाढवण्याची कंपनीची योजना आहे.


फ्लॅश स्पोर्ट्स अँड मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रॅडली नॅट्रास यांनी सांगितले की, विविध देशांतील क्रिकेट बाजारपेठांमध्ये एकात्मिक पद्धतीने काम करण्याची क्षमता या विलीनीकरणामुळे वाढेल. “प्रायोजक, प्रसारण भागीदार आणि चाहत्यांना एका व्यापक क्रिकेट परिसंस्थेत जोडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.


कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी एरिक शेर्ब यांच्या मते, सार्वजनिक बाजारपेठेतील संरचनेमुळे लीगच्या पायाभूत सुविधांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे आणि दीर्घकालीन उत्पन्नाचे स्थिर स्रोत निर्माण करणे शक्य होईल.


आयपीजीने स्पष्ट केले की, भविष्यात सर्व लीगमधील प्रायोजकत्व उत्पन्नाचे केंद्रीकरण, थेट सामन्यांचे ४के दर्जातील प्रसारण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सातत्यपूर्ण महसूल मॉडेल विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमांमुळे एलपीएलसह आयपीजीच्या अखत्यारीतील इतर टी-२० स्पर्धांना जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!