‘धर्मवीर’ नव्हे, तर शंभूराजे होते धीरोदात्त वीर!
– संजय आवटे
“धीरोदात्त, प्रतिभावंत, महापराक्रमी अशा शंभूराजांना ‘धर्मवीर’ ठरवणे हा त्यांच्यावर अन्याय आहे”, अशी पोस्ट मी मागे केली होती. तर, काहींनी त्यावर नकारात्मक कमेंट्स केल्या. धर्माच्या नावाने आजही स्वतःच्या पोळ्या भाजणा-यांना शंभूराजे ‘धर्मयोद्धे’ वाटत असतात! राजांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न पूर्वी ज्यांनी केला, तेच आता शंभूराजांना ‘धर्मवीर’ या एकमेव प्रतिमेत कैद करु पाहाताहेत!
महापराक्रमी असलेल्या माझ्या या अजिंक्य तरण्याबांड राजाला हरवण्यासाठी दिल्लीचे तख्त सोडून, बुजुर्ग औरंगजेब इथे वर्षानुवर्षे रानोमाळ झुंजत होता. रोज हरत होता. या संघर्षाला केवळ धार्मिक आयाम देणे हा शंभूराजांवर अन्याय आहे.
संभाजी राजे आणि औरंगजेब यांच्या संघर्षाला असणारा धार्मिक आयाम जे ठळक करू पाहातात, त्यांच्यासाठी पुढील प्रश्नः
१. शंभू राजांचे पुत्र थोरले शाहू महाराज औरंगजेबाच्या अटकेत होते. तेव्हा ते लहान होते. त्यांना औरंगजेबाने मुस्लिम का केले नाही?
२. त्यांचे लग्नही औरंगजेबाच्या अटकेत असतानाच झाले. पण, ते हिंदू पद्धतीने का झाले?
३. शाहू महाराजांना अत्यंत सन्मानाने औरंगजेबाने का वाढवले?
४. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका का झाली? तेव्हा, हे राज्य आपल्यासाठी मित्र-राज्य ठरेल, अशी त्यांची व्यूहरचना का होती?
५. शाहू महाराजांनी पुढे छत्रपती म्हणून चाळीस वर्षांहून अधिक काळ राज्यकारभार कसा केला?
६. शिवराय वा शंभूराजांकडे अगदी महत्त्वाच्या पदांवरही मुस्लिम होते. तिकडे औरंगजेबाकडेही निर्णायक स्थानी हिंदू दिसतात. असे कसे?
हे राजकारण होते.
बिपिन चंद्र नावाचे इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणेः ‘पावर’ आणि ‘प्लंडर” यासाठीचा हा संघर्ष होता. धर्म हा त्यात अजिबात मुद्दा नसेलच, असे नाही. पण, तो मुख्य वा मूलभूत मुद्दा नव्हता, यात शंका नाही.
कोल्हापूर गादीवरुन संघर्ष उफाळून आल्यानंतर, राजारामांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी आपल्या मुलाला, दुसऱ्या संभाजीला गादीवर बसवले. आणि, महापराक्रमी, तेजस्वी अशा ताराराणींना अंधारकोठडीत डांबले. ताराराणींचा मुलगा दुसरा शिवाजीही कोठडीत बंद होता. तिथे त्यांच्यावर असे अनन्वित अत्याचार झाले की दुसरा शिवाजी तिथेच मृत्युमुखी पडला.
दुसरीकडे, ज्या औरंगजेबाने येसूबाई आणि शाहूंना सन्मानाने वागवले, त्यानेच आपल्या वडिलांना, शाहजहानला, मात्र तुरुंगात डांबले आणि सख्ख्या भावांचे मुडदे पाडले. आपणच बांधलेल्या ताजमहालाकडे बघून अश्रू ढाळत शाहजहान आग्रा किल्ल्यावर मरण पावला.
सत्तासंघर्ष म्हणून हा इतिहास आपण वाचू लागतो, तेव्हा त्याला उगाच दिलेला धार्मिक आयाम पुसट होतो. आणि, समजा तो तेव्हा काही प्रमाणात असेल तरी त्या इतिहासावरुन आता कोणाची मुंडकी उडवायची का?
इतिहासात रमणे आणि प्रत्येकाने आपल्याला हवा तो इतिहास लिहिणे, ही आपल्या लोकांची खोड आहे. इतिहास खूप असतात हे खरे आणि इतिहास समकालीन असतो हेही खरे, पण प्रत्येकाने आपापल्या सांस्कृतिक अहंकारासाठी सोयीचा असा इतिहास लिहित सुटणे ही आपली विकृती आहे. इतिहासलेखन पूर्वी ज्यांच्याकडे होते, त्या ब्राह्मण्यग्रस्त हिंदुत्ववाद्यांनी तर इतिहासाची वाट लावलीच. पण, त्यांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल शंका व्यक्त करणाऱ्यांनी जो इतिहास लिहिला, तोही काही वस्तुनिष्ठच होता, असे नाही…!
आमचे विंदा करंदीकर म्हणूनच म्हणाले होते,
इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊनि ना नाचा
पदस्थल करुनि त्याचे
वरती चढुनी भविष्य वाचा …!
(लेखक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक आहेत. सदर लेख त्यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.)