पंतप्रधान मोदींनी जाहीर केले ४ ‘गगनयान’यात्री
इस्रोच्या आगामी महत्वकांक्षी मोहिमेतील एक मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यात केली आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर स्बबळावर अवकाशात पाठवले जाणार आहेत. यामध्ये सुमारे सहा टन वजानाची अवकाश कुपी अवकाशात पाठवली जाणार आहे. चार अंतराळवीरांना सामवण्याची क्षमता या कुपीची असेल. ही अवकाश कुपी पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर तीन दिवस प्रदक्षिणा घालेल असे गगनयान मोहिमेच्या पहिल्या समानवी मोहिमेचे नियोजन असणार आहे.
तेव्हा या अवकाश कुपीतून अवकाशात जात पृथ्वी भ्रमंती करणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. प्रशांत बाळकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला अशी ही चार नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ दौऱ्यात या चार अंतराळवीरांची नावे जाहिर करत त्यांना अंतिम तयारीसाठी शुभेच्छा दिल्यात.
हे चारही भारतीय वायू दलाचे अधिकारी आहेत. बंगळूरु इथे अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी खास सुविधा तयार करण्यात आल्या आहे. एवढंच नाही तर रशियामध्येही या चार जणांनी काही काळ अंतराळवीरासाठी आणि अवकाश प्रवासासाठी आवश्यक ते प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात अमेरिकेची नासाही इस्रोला मदत करणार आहे.
या आधी एप्रिल १९८४ ला राकेश शर्मा यांनी तेव्हाच्या सोव्हिएत रशियाच्या Soyuz T-11 या यानातून अवकाश भ्रमंती करत भारताचे पहिले अंतराळवीर होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी अन्य देशांचे प्रतिनिधी म्हणून अंतराळवीर म्हणून अवकाश वारी केली.
असं असलं तरी आत्तापर्यंत भारताने स्बळाबळावर भारतीय अंतराळवीर अकाशात पाठवला नव्हता. तेव्हा देशाचे हे चार अंतराळवीर २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगयनान मोहिमेतून अवकाश भ्रंमती करणार आहेत.
स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. बलाढ्य युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा यांनाही हे अजुनतरी शक्य झालेलं नाही.