
वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; NEET प्रकरणी पारदर्शकतेची मागणी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत, NEET परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. वांगचुक यांच्या उपोषणाचा १९ वा दिवस सुरू असताना त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडली.
राज ठाकरे यांनी म्हटले की, प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील गोंधळामुळे लाखो विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. हा विषय राजकीय नसून सामाजिक असून, त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
https://www.facebook.com/share/1D8yT89VfY/
वांगचुक यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केंद्र सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
राज ठाकरे यांनी नागरिकांनी केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता लोकशाही मार्गाने प्रश्न उपस्थित करावेत, असे सांगत पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा कायम राहील, असे स्पष्ट केले.







