
दिगंबर कामत मडगावमध्ये दहशतवादी हल्ल्याची वाट पाहत आहेत का? : प्रभव
मडगाव :
पहलगाम-काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतरच गोवा पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली ज्यामुळे मडगावचे पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांनी मडगावमध्ये “बेकायदेशीर अड्डे” उघडकीस आणले. मडगावमध्ये दहशतवादी हल्ला होईपर्यंत मडगावचे आमदार दिगंबर कामत मूक प्रेक्षक बनुन बघ्याची भूमिका घेतील का? असा संतप्त सवाल मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे.
मडगावचे पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांनी माध्यमांसमोर केलेल्या बेकायदा अड्ड्यांच्या खुलाशांवर प्रतिक्रिया देताना, प्रभव नायक यांनी बेकायदेशीर घरांमध्ये राहणाऱ्या लोकांची ओळख पोलिसांनाही माहित नसणे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. मडगावात धोकादायक परिस्थिती आहे आणि देवही आपल्याला वाचवू शकणार नाही. सत्य उघड केल्याबद्दल मी मडगावचे पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांचे अभिनंदन आणि आभार मानतो, असे प्रभव नायक म्हणाले.
मडगावच्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. पोलीस निरीक्षकांनी स्वतः कबूल केले आहे की त्यांनी भेट दिलेल्या बेकायदेशीर घरांमध्ये राहणारे समाजकंटक अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. दुर्दैवाने, मडगाव नगरपालीका गाढ झोपेत आहे, असा टोला प्रभव नायक यांनी हाणला.
मडगावचो आवाज सातत्याने हे मुद्दे उपस्थित करत आहे. आम्ही यापुर्वीच मुख्यमंत्री, आरोग्य आणि नगरविकास मंत्री, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, मडगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक यांना निवेदने सादर करून त्यांचे लक्ष वेधले आणि कारवाईची मागणी केली आहे, असे प्रभाव नायक यांनी सांगितले.
या सर्व बेकायदेशीर कृत्यांच्या गॉडफादरला मडगावकरांनी शिक्षा करण्याची वेळ आली आहे. मडगाव शहराच्या बिघाडाला पक्षबदलू आमदार दिगंबर कामत जबाबदार आहेत. एकेकाळी सुंदर असलेल्या या शहराचे सर्वात असुरक्षित ठिकाणी रूपांतर करण्यास ते कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप प्रभव नायक यांनी केला.
अनेक तज्ञांशी चर्चा करुन मडगाव शहर एक सुरक्षित, स्वच्छ आणि हिरवे बनविण्याचा कृती आराखडा बनविण्याचे काम मडगावचो आवाजने हातात घेतले आहे. मडगावकरांच्या सहकार्याने मडगाव शहराचे गतवैभव पुन्हा मिळवीण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे प्रभव यांनी सांगितले.