‘माझे घर योजनेअंतर्गत आणखी ३ हजार सनदांचे होणार वितरण’
पणजी :
सरकारी, खासगी व कोमुनिदादच्या जमिनींवरील घरे लोकांच्या नावावर करणाऱ्या ‘माझे घर’ योजनेअंतर्गत आणखी ३ हजार अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. उत्तर व दक्षिण गोव्यात १० आणि ११ जून रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून या ३ हजार घरांच्या सनदांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोचविण्यासह केंद्रातील एनडीए सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यातील प्रत्येक मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पणजी येथे आज भाजप, मगोप आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध निर्णयांची माहिती दिली.
एनडीए सरकारला १२ वर्षे पूर्ण; पंतप्रधानांचे अभिनंदन
केंद्रातील एनडीए सरकारला यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. या निमित्ताने गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात गोवा दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, त्यांच्या हस्ते राज्यातील विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल. सद्यस्थितीला सुरू असलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर सरकारचा भर असून बैठकीत या कामांचा आढावा घेण्यात आला.
मंत्रिपदाबाबत बैठकीत चर्चा नाही
राज्यातील रिक्त मंत्रिपद कोणाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी आजच्या बैठकीत मंत्रिपदाबाबत कोणताही खल झाला नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

