
वासुदेव साने स्मृती चषक दुहेरी गडी क्रिकेट स्पर्धेची सांगता; श्री स्वामी समर्थ संघ विजेता
फोंडा : सवई-वेरे येथील पाथ मैदानावर ५ ते ७ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘कै. वासुदेव साने स्मृती चषक’ दुहेरी गडी हार्ड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती लावली.
अंतिम सामन्यात राजत कुडाळकर आणि शुभम झा यांच्या ‘श्री स्वामी समर्थ’ संघाने विजेतेपद पटकावत चषकासह एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले. साहिल गावंकर आणि तन्वेश खेडेकर यांच्या ‘गणपती वॉरियर्स’ संघाने उपविजेतेपद मिळवत ५० हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.
स्पर्धेतील उपांत्य फेरीत संदीश ठाकूर व अपाली कलंगुटकर यांच्या ‘रौनक क्रिकेटर्स’ तसेच नंदेश गौडा व सोनू शर्मा यांच्या ‘शेहजाद रॉयल्स’ संघांनी स्थान मिळविले. या दोन्ही संघांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाला अॅड. इफ्तिखार आगा, शिवराम पार्सेकर, नरसिंह साने, श्रीपाद साने, अनंत साने, लक्ष्मीदास साने, डॉ. जयश्री मडकईकर आणि विपुला प्रभू उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व सहभागी खेळाडूंना चषक, पदके आणि रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी खेळाडूंच्या क्रीडाभावना, शिस्तबद्ध खेळ आणि उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. युवकांनी क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी संघ, प्रायोजक, पंच, स्वयंसेवक आणि क्रिकेटप्रेमींचे आयोजकांनी आभार मानले. तळागाळातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा आणि भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




