गोवा

के. वैकुंठ यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून राजेंद्र तालक यांना पदावरून हटवण्याची मागणी

मडगाव : प्रख्यात सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांच्या प्रामाणिकपणा आणि व्यावसायिक निष्ठेबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रवींद्र भवन, मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांना पदावरून हटविण्याची मागणी राज्य सांस्कृतिक विकास समितीचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी केली आहे.


रवींद्र भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात तालक यांनी के. वैकुंठ यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधताना ‘शितू’ या कोकणी चित्रपटाला पहिल्या राज्य चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला नसल्याचे आणि दुसऱ्या चित्रपटाला पुरस्कार देण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचे सांगितल्याचा दावा केला होता. या विधानामुळे के. वैकुंठ यांच्या प्रामाणिकपणा, स्वायत्तता आणि परीक्षक म्हणून असलेल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप पै काकोडे यांनी केला आहे.


“असा गंभीर आरोप कोणत्याही पुराव्याशिवाय करणे अयोग्य आहे. के. वैकुंठ यांच्यासारख्या तत्त्वनिष्ठ व्यक्तीने कोणत्याही दबावाला बळी पडण्याऐवजी परीक्षकपदाचा राजीनामा देणे पसंत केले असते,” असे पै काकोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालक यांनी आपल्या दाव्याचे पुरावे सादर करावेत किंवा सार्वजनिकरीत्या माफी मागून विधान मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.


‘शितू’ चित्रपटासंदर्भात तालक यांनी केलेल्या दाव्यावरही पै काकोडे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, हा चित्रपट १९७४ मध्ये नव्हे तर सुमारे १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. उपलब्ध माहितीनुसार चित्रपटाची निर्मिती सृष्टी क्रिएशन्सने केली असून दिग्दर्शन प्रदीप मुळये यांनी केले होते. त्यामुळे तालक यांनी स्वतःला या चित्रपटाचे निर्माते किंवा दिग्दर्शक म्हणून सादर केले असल्यास त्यासंबंधीचे पुरावे सार्वजनिक करावेत, असेही त्यांनी म्हटले.


पहिल्या राज्य चित्रपट महोत्सवात गौरविण्यात आलेल्या ‘देखणी दुराय’ या कोकणी चित्रपटाचा अप्रत्यक्ष अवमानही तालक यांच्या वक्तव्यातून होत असल्याचा आरोप पै काकोडे यांनी केला. अशा वक्तव्यांमुळे कोकणी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांच्या योगदानाचे अवमूल्यन होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


गोव्यातील सांस्कृतिक आणि कलावंतांचा वारसा जपणे ही सांस्कृतिक संस्थांची जबाबदारी असून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशी विधाने टाळली पाहिजेत, असे सांगत पै काकोडे यांनी कला आणि संस्कृती मंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून राजेंद्र तालक यांना अध्यक्षपदावरून हटवावे, अशी मागणी पुन्हा केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!