गोवा

‘मडगावचो आवाज’ पोहोचला मोर्थ आणि साबाखापर्यंत…

पणजी : मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळीसमोरील रस्त्यांच्या सुधारणेसाठी सरकारने पुढाकार घेतल्याचे स्वागत केले आहे. गोमेको परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, पाणी साचणे आणि रुग्ण, रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन सेवांना होणाऱ्या अडचणींबाबत केलेल्या सातत्यपूर्ण निवेदनांनंतर ही बाब आता मार्गी लागल्याचे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले.


प्रभव नायक यांनी सांगितले की, 27 मे 2025 रोजी मडगावचो आवाजतर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ बांबोळी येथे रस्त्यांची दुरवस्था, पाणी साचणे आणि रुग्णवाहिकांसह आपत्कालीन सेवांच्या प्रवेशातील अडचणींकडे लक्ष वेधले होते.


जवळपास वर्षभर कोणतीही ठोस कार्यवाही दिसून न आल्याने 27 मे 2026 रोजी पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्मरणपत्र देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच रस्ते अभियांत्रिकी, ड्रेनेज नियोजन आणि कामाच्या अंमलबजावणीबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली होती.


“27 मे 2025 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना केलेले निवेदन आणि त्यानंतर 27 मे 2026 रोजी दिलेले स्मरणपत्र यामुळे अखेर परिणाम दिसून येत असल्याचे वाटते. गोवा मेडिकल कॉलेज बांबोळीसमोरील रस्त्यांच्या सुधारणेचे काम सरकारने हाती घेतले आहे. आता हे काम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे,” असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.


सार्वजनीक बांधकाम खाते आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचे स्वागत करताना नायक यांनी स्पष्ट केले की, केवळ बैठका आणि नियोजन न करता त्याचे प्रत्यक्ष कामात रूपांतर होणे आवश्यक आहे. प्रस्तावित सुधारणांमध्ये वाहतूक सुरळीत होणे, पाण्याचा निचरा, पूरस्थिती रोखणे आणि गोमेको पर्यंत सुरक्षित व सुलभ प्रवेश या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.


“सातत्याने केलेल्या जनहिताच्या निवेदनांमुळे सरकारच्या प्राधान्यक्रमावर एखादा प्रश्न पुन्हा आणता येतो, हे यावरून स्पष्ट होते. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो; मात्र खरी कसोटी वेळेत होणारी अंमलबजावणी आणि रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी व रुग्णवाहिकांना भेडसावणाऱ्या जुन्या समस्या कायमस्वरूपी दूर होण्यात आहे,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!