
भाजप-काँग्रेसवर केजरीवालांचा निशाणा
पणजी : उत्तर गोव्यातील महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने आम आदमी पक्षाने (आप) तयारी सुरू केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि गोवा प्रदेशातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बुधवारी कुंभारजुवा येथे स्वयंसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर पणजी येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक झाली. या बैठकांमध्ये आगामी काळातील पक्षविस्तार आणि बूथ पातळीवरील संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कुंभारजुवा येथील बैठकीत मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले. भाजपच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करताना बदल आणि विकासाच्या अपेक्षेने भाजपला मतदान केले; मात्र भ्रष्टाचार, पक्षांतर आणि विश्वासघातामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाल्याचा दावा स्वयंसेवकांनी केला. भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्येही ‘आप’ला पर्याय म्हणून स्वीकारण्याची मानसिकता वाढत असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
पणजी येथील बैठकीत केजरीवाल यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बूथ पातळीपर्यंत संघटन मजबूत करण्याचे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या राजकारणाला गोमंतकीय जनता कंटाळली असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसला दिलेले मत अखेरीस भाजपच्या फायद्याचे ठरते, असा आरोप करत भाजप-काँग्रेसच्या कथित ‘जॉइंट व्हेंचर’ला ‘आप’ हा पर्याय असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.
गोवा ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी उत्तर गोव्यात भाजपच्या मतदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा केला. काँग्रेसमधून भाजपमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पक्षांतरामुळे भाजपने आपल्या पारंपरिक मतदारांना गृहीत धरल्याचे ते म्हणाले. स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने मतदार नाराज आहेत. त्याचवेळी काँग्रेसबाबतही मतदारांमध्ये विश्वासाचा अभाव असल्याचे नाईक यांनी सांगितले.
काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपमध्ये पक्षांतर करू शकतो, अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे भाजपविरोधातील नाराजी असूनही काँग्रेसला पर्याय मानण्यास मतदार तयार नसल्याचे नाईक यांनी नमूद केले.
‘आप’चे गोवा संघटन सचिव प्रशांत नाईक यांनीही भाजपच्या मतदारांमध्ये असंतोष वाढल्याचा दावा केला. वाढीव वीजबिले, अपुरा पाणीपुरवठा, सार्वजनिक बससेवेची कमतरता, रोजगाराच्या संधींचा अभाव आणि कायदा-सुव्यवस्थेबाबतच्या प्रश्नांमुळे सरकारविरोधात नाराजी असल्याचे ते म्हणाले. मात्र, या नाराजीचा राजकीय फायदा घेण्यासाठी काँग्रेसकडे विश्वासार्ह पर्याय म्हणून पाहिले जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
उत्तर गोव्यातील प्रमुख विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक उपस्थिती वाढविणे, बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी थेट संपर्क वाढविणे, या दिशेने ‘आप’ने हालचाली सुरू केल्या आहेत.
