शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी कर्नाटक, मंगळुरू येथे रौप्यमहोत्सवी अखिल भारतीय कोंकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिध्द साहित्यिका हेमा नायक यांनी एकूणच भाषा, राजकारण, समाजकारण आणि विचारकारणाबद्दल सविस्तर मांडणी केली. त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग.
एकविसाव्या शतकाची पंचविशी ओलांडताना काही प्रश्नांनी एकूणच मानवी सभ्यता, राष्ट्र, भूगोल, भाषा आणि अस्मितेच्या प्रस्थापित सिध्दांतांना आव्हान दिले आहे. कोरोना महामारीमुळे झालेले मानवी एकत्रिकरण एकूणच बाजारपेठी संकल्पनेच्या भोवर्यात अडकलेले आहे. गरज आणि मागणीमुळे आज नवी भौगोलिक समिकरणे जन्माला घातली आहेत. तसेच राष्ट्रीय अस्मिता आणि सीमारेषांची नव्याने पुर्नबांधणी सुरू झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बोलतो ती भाषा आणि त्या भाषेत तयार होत असलेले एकूणच साहित्य ही बदलती समीकरणे आत्मसात करण्यास तयार आहेत काय? यावर विचार होणे गरजेचा आहे.
आपल्या कोंकणी चळवळीने सर्व सामाजिक आणि जातीय समीकरणांचा विचार केला. मात्र, ‘स्त्री’ हा नियम आणि तत्त्व म्हणून कधीच स्वीकारले गेले नाही. खरे तर पुरुषप्रधानता प्रत्येक क्षेत्रात सहजपणे दिसून येते. धर्म, देश, जात आदींमधूनही ती ठळकपणे पुढे येते. तथापि, आपणांस एक गोष्ट विसरता येणार नाही, ती म्हणजे देशात नुकत्याच झालेल्या जी-20च्या शिखर परिषदेत एक अनोखी घोषणा देण्यात आली. ‘महिलांच्या नेतृत्वाखाली विकास’ आणि गंमत म्हणजे 20 पैकी 19 पुरुष राष्ट्रप्रमुखांनी ती दिली. पण भाषेचा विकास हा नेहमीच ‘स्त्रीच्या नेतृत्वाखालीच’ असतो. त्यामुळेच माणसाच्या मूळभाषेला ‘मातृभाषा’ संबोधले जाते, याच त्याचा सर्वात मोठा पुरावा होय.
मौखिक साहित्य आणि लोककथा हे भाषेचे प्राण आहेत. या दोन्हीमध्ये महिलांच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागोर, फुगडी आणि धालो या गोव्यातील लोककला प्रकारातील प्रतीके आणि कविता या त्या-त्या वेळच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सातत्याने भाष्य करणार्या आहेत. ‘कितली म्हारगाय गे सायबिनी’ ही फुगडी रचणारी अज्ञात कवयित्री ही ‘अरे संसार संसार’ रचणार्या बहिणाबाईंएवढीच आपल्याला महत्वाची असली पाहिजे.
स्वातंत्र्य चळवळीत ‘एक देश, एक संविधान’ हे आपल्या एकतेचे प्रतीक होते. ‘एक संविधान’ जे आपल्यातील सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेचे प्रतीक आहे. युरोपकडून आपण ‘राष्ट्र’ संस्था घेतली. तो त्यांच्या सिध्दांत आहे. ’एक भाषा-एक देश’, ’एक संस्कृती-एक देश’ या संकल्पना युरोपात प्रचलित होत्या. तथापि, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ‘विविधतेतील एकता’ ही संकल्पना युरोपीय राष्ट्र-राज्यासाठी बाधक होती. त्यामुळे ‘विविधतेतील एकता’ ही संकल्पना वसाहतवादातून नव्याने उदयास आलेल्या देशांसाठी आदर्श ठरली. आज मात्र, एक देश आणि सर्व काही एकत्र करून नव्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची रूपरेषा बदलण्याचा प्रयत्न होत आहे. ‘एक देश’, ‘एक कर’ आणि असे करताना ‘एक भाषा’ लादण्याचा हा प्रयत्न आहे.
कोंकणी चळवळ ही लोकसंघर्षाची चळवळ आहे. कोंकणी गोव्याची राजभाषा व्हावी, गोवा हे घटकराज्य व्हावे आणि त्याचा संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश व्हावा या त्रिसूत्री मागण्यांसाठी आम्ही आंदोलन केले. हे आंदोलन 555 दिवस चालले असले तरी त्याचे मूळ गोवा मुक्ती आणि सार्वमत कौल आंदोलनात होते. त्या आंदोलनामुळे गोव्याला घटकराज्याचा दर्जा मिळाला आणि कोंकणी ही गोव्याची राजभाषा बनली. असे असले तरी, आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, ती म्हणजे आपल्या चळवळीला आवश्यक असलेले राजकीय ज्ञान त्यावेळी आपल्याकडे नव्हते. आंदोलने आम्ही यशस्वी केली, विजय खेचून आणले आणि ते राजकारण्यांच्या हाती दिले. कोंकणी चळवळ राज्याच्या धोरणांवर अवलंबून राहिली नाही. राजकारण्यांनी गोव्याच्या जमिनीच्या ‘विकासा’ची काळजी घेतली. पण त्या जमिनीवर राहणार्या लोकांची नाही. कोंकणी चळवळीला मासेमार, आदिवासी, शेतकरी आणि कामगारांनी पूर्ण पाठिंबा दिला, त्यामुळे कोंकणी चळवळीने त्या वर्गांच्या प्रश्नांशी जी बांधिलकी दाखवायला हवी होती, त्यात चळवळ आणि आपले साहित्य कमी पडले आहे.
कोंकणी लेखकाने सतत लोकसंघर्षांच्या हितासाठी झटले पाहिजे. त्यासाठी लिहिले पाहिजे. पण, आपल्या भाषेचा एक मोठा घटक प्रस्थापित व्यवस्थेच्या नादी लागला आहे. याचे कारण कोंकणी ही राजभाषा झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये, अकादमीपर्यंत कोंकणी पोहोचली आणि त्या त्या संस्थांना अनुदान मिळू लागले. आज बहुतेक कोंकणी साहित्यिक उपक्रम याच कारणामुळे होत आहेत. त्याच परिषदा आणि तेच उत्सव. मग तेच तेच चेहरे आणि तेच विचार. आता तर काही साहित्यिक कार्यक्रमांमध्ये स्वतः प्राध्यापक मंडळीच सर्जनशील साहित्याविषयी बोलत आहेत. अपवादात्मक संख्येने काही प्राध्यापक व्यवस्थाशरण न जाता आपला वेगळा विचार मांडताना दिसतात.
कोंकणी भाषेच्या प्रस्थापित परिघाबाहेर जाऊन आता आम्हाला साहित्यनिर्मिती करण्याची गरज आहे. मात्र, असे असताना आज आपल्या समाजातील संघर्षात कोंकणी लेखकांची भूमिका काय आहे? सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात आहे. पण त्याचा उपयोग बहुतेक लेखक ‘सुप्रभात’, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ आणि ‘मृताम्यास शांती लाभो’ असे पाठवण्यासाठी करतात. कोंकणीचा प्रसार आणि प्रचार हा प्रस्थापित चळवळीच्या परिघाबाहेर पोहोचला आहे, ही बाब चळवळीने वेळीच लक्षात घेतली नाही तर चळवळीला लोकाश्रय मिळणे दुरापास्त होईल. त्यामुळेच आता ज्येष्ठांनी चळवळीचा प्रश्न नव्या पिढीकडे सोपवणे गरजेचे आहे.
…
(अनुवाद आणि संपादन : किशोर अर्जुन)