
पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही : सुभाष फळदेसाई
मडगाव : राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम आणि पेयजल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला. राज्यात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
फळदेसाई म्हणाले की, पाणी व्यवस्थापनात करण्यात आलेल्या सुधारणा आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांमुळे ही परिस्थिती नियंत्रणात आहे. मान्सूनपूर्वी प्रमुख धरणे आणि जलाशयांमध्ये आवश्यक पाणीसाठा राखून ठेवण्यात आला होता. मात्र, पावसाअभावी काही प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी सरकार आवश्यक उपाययोजना करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. साळावली धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा आणखी वाढू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
रोहिंग्यांच्या उपस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर, राज्यात अशा व्यक्ती असल्यास कोणताही अनर्थ होण्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगताना सध्या यासंदर्भात आपल्याकडे ठोस माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
काँग्रेसने ‘आमदार राखो यात्रा’ काढावी; ‘आप’चा टोलाSeptember 22, 2026
-
हडफडे–नागोवा जंक्शन मार्गावर पथदिव्यांची गरजSeptember 21, 2026
सांगे येथे आगीत जळालेल्या सहा दुकानांच्या नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल. तसेच वैयक्तिक स्तरावरही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाबाबत बोलताना फळदेसाई म्हणाले की, उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेणार आहे. एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो स्वीकारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.







