गोवा

जंतरमंतरवरील देशव्यापी आंदोलनाला आपचा पाठिंबा

सोनम वांगचुक यांच्या उपोषणात गोवा नेत्यांचा सहभाग

पणजी : देशभरात वारंवार घडणाऱ्या परीक्षा पेपरफुटीच्या घटनांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आम आदमी पक्षाने (आप) पाठिंबा जाहीर केला आहे. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आझाद मैदानावर आयोजित एकदिवसीय उपोषणात आप गोव्याचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, वेळीमचे आमदार इंजि. क्रूझ सिल्वा आणि पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शविण्यात आला.

परीक्षा पेपरफुटीच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून, या मागणीला आपने समर्थन दिले आहे.

यावेळी बोलताना आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले की, आंदोलन दडपण्याचे अनेक प्रयत्न करूनही विद्यार्थी आणि युवकांनी शांततापूर्ण मार्गाने आपला लढा सुरू ठेवला आहे. युवकांचा आवाज दाबण्याचा आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यापासून त्यांना रोखण्याचा सरकारचा प्रयत्न निष्फळ ठरल्याचा दावा त्यांनी केला.

देशभरातील लाखो विद्यार्थी आणि युवक परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात एकत्र आले असून, सरकारने या प्रश्नांबाबत उत्तरदायित्व स्वीकारावे, अशी त्यांची मागणी असल्याचे नाईक यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सलग २२ दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटविण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

वेळीमचे आमदार इंजि. क्रूझ सिल्वा यांनी, वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य पेपरफुटीमुळे धोक्यात येत असल्याची खंत व्यक्त केली. अशा घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येत असून काहींनी टोकाची पावले उचलल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकारकडून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नसल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे संरक्षण करण्याला प्राधान्य दिले जात असल्याची टीकाही सिल्वा यांनी केली.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर आंदोलन दडपण्याचा आणि युवकांचा लोकशाही मार्गाने होणारा विरोध रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मात्र, सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या निर्धारामुळे आंदोलन अधिक व्यापक झाल्याचा दावा त्यांनी केला.

वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, आंदोलनस्थळावरून हटविल्यानंतरही सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवले आणि कोणत्याही प्रकारचे अन्न किंवा कृत्रिम पोषण स्वीकारले नाही. त्यांच्या अहिंसक आणि शांततापूर्ण भूमिकेमुळे अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देशभरातील युवकांना मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

शांततेच्या मार्गाने न्याय, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी लढणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि युवकाच्या पाठीशी आम आदमी पक्ष ठामपणे उभा असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाने पुन्हा केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!