पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला चौथं पदक निश्चित करून देणारी कुस्तीपटू विनेश फोगट (vinesh Phogat) हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन जास्त होते. इंडियन एक्सप्रेसने सकाळी दिलेल्या वृत्तानुसार विनेशचे वजन जास्त होते. यांनतर आता तिला अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
विनेशने मंगळवारच्या लढतीसाठी वजन केले होते. नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. वृत्तानुसार सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या कुस्तीपटूचे वजन मंगळवारी रात्री अंदाजे २ किलो वजन जास्त होते. ती रात्रभर झोपली नव्हती आणि निकष पूर्ण करण्यासाठी तिने जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते अपुरे पडल्याने विनेशला आता अपात्र ठरवण्यात आले आहे.
‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.
विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करून मोठा धक्का दिला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीतील जपानी कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव आहे, ज्यामुळे विनेशचे यश आणखीनच खास झाले आहे. संपूर्ण सामन्यात विनेश फोगट २-० ने पिछाडीवर सामना अवघ्या काही सेकंदांवर येऊन पोहोचला होता. विनेश पराभूत होणार असंच दिसत होतं, पण शेवटची १० सेकंदापेक्षा कमी वेळ बाकी असताना विनेशने सामना पलटला आणि ३-२ फरकाने दणदणीत विजय मिळवला.