
द केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर जोरदार गजहब उडाला होता. यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावर आता राजकीय टीका-टिप्पणी होऊ लागली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा चित्रपट धर्मनिरपेक्षा मूल्यांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले की, सदर चित्रपट केरळच्या धार्मिक सौहार्दाच्या परंपरेला धक्का निर्माण करू शकतो.
मुख्यमंत्री विजयन यांनी द केरला स्टोरीच्या पहिल्या भागाचा उल्लेख केला. पहिल्या भागातून केरळ राज्याविरोधात द्वेष पसरविण्यात आला आणि राज्याच्या धर्मनिरपेक्ष परंपरेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला भाग बनविण्याचे मागे केरळविरोधात अपप्रचार करून द्वेष पसरविण्याचा एक अयशस्वी प्रयत्न होता.
द केरळ स्टोरीच्या दुसऱ्या भागात केरळ व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये बळजबरीने धर्मांतर होत असल्याचा विषय मांडला गेला आहे.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटाविरोधात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. समाजात द्वेष आणि दरी निर्माण करणाऱ्या विखारी चित्रपटाला प्रदर्शित करण्याची परवानगी का दिली जात आहे? दुसरीकडे बीफ (स्पॅनिश चित्रपट) या चित्रपटाला केवळ त्याच्या नावामुळे अनेक महोत्सवातून वगळण्यात आले होते.
मुख्यमंत्री विजयन पुढे म्हणाले, परस्पर संमतीने केल्या गेलेल्या विवाहांनाही जातीयवादी ठरवून त्यावर धर्मांतराचा शिक्का मारत खोटा प्रचार केला जात आहे. चित्रपटात आंतरधर्मीय लग्नावर चुकीचे भाष्य असल्याचेही ते म्हणाले.
बाहेरील शक्ती केरळमधील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. केरळमध्ये कधीही जातीय दंगली होत नाहीत. इथे सर्व समुदायांमध्ये परस्पर आदराची संस्कृती आहे. मात्र केरला स्टोरीसारखे चित्रपट ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असतात, असाही आरोप मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला.





