विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातून “घोस्ट व्होटर” कार्यरत? : विशाल पै काकोडे
विशाल पै काकोडे यांनी आपल्या ईमेलमध्ये नमूद केले की विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाशी संबंधित एखाद्या व्यक्तीने एकाहून जास्त मतदार नोंदण्या केल्या असतील तर ती केवळ किरकोळ चूक मानता येत नाही. सदर प्रकार म्हणजे लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांवर आघात करणारी गंभीर निवडणूक अनियमितता ठरते. करदात्यांच्या पैशातून चालणाऱ्या सार्वजनिक कार्यालयाशी संबंधित असलेल्या व्यक्तिने सदर प्रकार करणे हे धक्कादायक असल्याचे विशाल पै काकोडे यांनी म्हटले आहे.
सध्या कॉंग्रेस पक्ष “व्होट चोरी”चा मुद्दा उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी करत असताना, कॉंग्रेसचे विधीमंडळ गट नेते असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात अशा व्यक्तीची उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते. सदर व्यक्तीची पार्श्वभूमी तपासून नेमणूक करण्यात आली होती का आणि “लायझन ऑफिसर”सारखी अधिकृत मान्यता नसलेली पदनिर्मिती नेमक्या कोणत्या अधिकाराखाली करण्यात आली? असा प्रश्न विशाल पै काकोडे यांनी विरोधी पक्षनेत्यांना विचारला आहे.
आपल्या पत्रात पै काकोडे यांनी सदर व्यक्तीला नेमकी कोणती कामे देण्यात आली होती याबाबतही स्पष्टता मागितली आहे. त्यांनी इशारा दिला की संशयास्पद मतदार नोंदी असलेल्या व्यक्तींची अशा प्रकारे सार्वजनिक कार्यालयात नेमणूक केल्यास कार्यालयाच्या गैरवापर होवू शकतो आणि लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्वास कमी होऊ शकतो.
विशाल पै काकोडे यांनी सांगितले की त्यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी विरोधी पक्षनेत्यांना सदर प्रकाराची माहिती ईमेलद्वारे कळवून स्पष्टीकरण मागितले होते आणि सात दिवसांत संपूर्ण तथ्ये गोमंतकीय जनतेसमोर मांडण्याचे आवाहन केले होते. मात्र आजपर्यंत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पै काकोडे यांनी म्हटले आहे.





