गोवा

गोव्यात डिझेलची मागणी वाढली; तेल कंपन्यांची पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी धावपळ

पणजी : गोव्यात गेल्या काही दिवसांत डिझेलच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले असून, वाढत्या मागणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पुरवठा यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांकडून राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंड पुरवठा ठेवण्यासाठी विशेष समन्वय साधला जात आहे.


१ ते २१ मे २०२६ या कालावधीत गोव्यात हाय-स्पीड डिझेलच्या (एचएसडी) विक्रीत १४.३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी याच कालावधीत १६,३५३ किलोलीटर डिझेलची विक्री झाली होती. यंदा हा आकडा १८,६९७ किलोलीटरवर पोहोचला आहे.


ग्रामीण भागातील शेतीकामांचा हंगाम, नांगरणी आणि कापणीची वाढलेली कामे यामुळे डिझेलची मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय खासगी पुरवठादार आणि सार्वजनिक क्षेत्रातील इंधन दरांमधील फरकामुळे अनेक ग्राहक सरकारी कंपन्यांच्या पेट्रोलपंपांकडे वळल्याचेही चित्र आहे. व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांनी किरकोळ विक्री केंद्रांमधून इंधन खरेदी वाढवल्याने मागणीत आणखी भर पडली आहे.


वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी टर्मिनल, डेपो, पाइपलाइन आणि एलपीजी बॉटलिंग प्रकल्पांमधील हालचाली वाढवल्या आहेत. विविध भागांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक आणि पुनर्भरण व्यवस्था चोवीस तास सुरू ठेवण्यात आली आहे.


दरम्यान, देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा तेल उद्योगाने केला आहे. नागरिकांनी घाबरून अतिरिक्त इंधन खरेदी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!