गोवा

गोव्याच्या हवामानात हायड्रॉलिक पार्किंग अयोग्य : प्रभव नायक

मडगाव: मडगांवचो आवाजचे युवा नेते प्रभव नायक यांनी आज गोवा स्टेट अर्बन डेव्हलपमेंट एजन्सी (जीसुडा) च्या अभियंत्यांची भेट घेऊन प्रस्तावित मडगाव शहरातील हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सखोल तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अभ्यास करावा, अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत समाजसेवक वेंसी सिरीलो अँजेलो गोन्साल्विस आणि प्रकाश शेटकर उपस्थित होते.


“हायड्रॉलिक पार्किंग कागदावर आकर्षक वाटू शकते, परंतु मडगाव ही प्रयोगशाळा नाही. गोव्याच्या हवामानाचा विचार करून सविस्तर व्यवहार्यता अभ्यास होणे आवश्यक आहे. निवडणूक निधी उभारणीसाठी लोकांवर अव्यवहार्य प्रकल्प लादण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.


नायक यांनी निदर्शनास आणून दिले की हायड्रॉलिक पार्किंग यंत्रणांना नियमित देखभाल, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणात खर्चाची आवश्यकता असते. गोव्याच्या दमट व किनारी हवामानामुळे गंज आणि तांत्रिक बिघाडाची शक्यता अधिक असल्याने हा प्रकल्प भविष्यात निष्क्रिय ठरण्याचा धोका असल्याचे त्यांनी म्हटले.


बैठकीदरम्यान प्रभव नायक यांनी २२ सप्टेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या निवेदनाला अद्याप उत्तर का देण्यात आले नाही, असा सवाल अधिकाऱ्यांना केला. या निवेदनात प्रकल्पाची व्यवहार्यता, तांत्रिक अभ्यास, सल्लागारांची नियुक्ती आणि कार्यपद्धती यासंदर्भात माहिती मागविण्यात आली होती.


नायक यांनी जीसुडा किंवा इतर यंत्रणांमार्फत राबविण्यात आलेल्या तत्सम हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्पांची माहितीही मागितली. तसेच अशा प्रकल्पांचा अनुभव असलेल्या सल्लागारांची पात्रता व किनारी भागांतील त्यांच्या कामाचा तपशील सादर करण्याची मागणी केली.

जीसुडाने आरटीआय अर्जाला देण्यात आलेल्या अपूर्ण उत्तरांबाबतही प्रभव नायक यांनी नाराजी व्यक्त केली. व्यवहार्यता अहवाल, सल्लागार नियुक्ती, झालेला खर्च, देखभाल जबाबदाऱ्या आणि निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी करत सार्वजनिक निधी खर्च करण्यापूर्वी पूर्ण पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!