
गोवा वाचवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे; आघाडीसाठी ‘आप’ची तयारी
पणजी : आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) विरोधी पक्षांसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, कार्याध्यक्ष गर्सन गोम्स आणि संघटन सचिव प्रशांत नाईक यांना अधिकृतपणे चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार क्रूझ सिल्वा, कार्याध्यक्ष गर्सन गोम्स आणि प्रशांत नाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२७ ची निवडणूक ही केवळ सत्तेसाठी नसून राज्य, लोकशाही आणि संविधान वाचवण्याची वैचारिक लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.
वाल्मिकी नाईक म्हणाले की, राज्यात निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले असून भाजप सरकारबद्दल जनतेत नाराजी आहे. त्यामुळे भाजपविरोधी पक्षांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. गोव्यात स्थिर सरकार स्थापन व्हावे आणि भविष्यातील पक्षांतरांना आळा बसावा, यासाठी स्पष्ट बहुमत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. किमान ३५ आमदारांचे बहुमत असलेले सरकार सत्तेत यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आणि गोव्याची जमीन, पर्यावरण, ओळख तसेच संविधानाचे संरक्षण करण्याच्या समान उद्दिष्टाने काम करणाऱ्या पक्षांसोबत आघाडी करण्यास ‘आप’ तयार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. स्थिर सरकारने राज्यातील पर्यावरण संरक्षणाबरोबरच मोफत वीज, दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षणासारख्या लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.
आमदार क्रूझ सिल्वा यांनी गोव्याची जमीन, जंगले आणि नद्या धोक्यात असल्याचा आरोप करत भाजप सरकारवर नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली. गोव्याच्या हितासाठी काम करू इच्छिणाऱ्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपला पुढील निवडणुकीत एक अंकी जागांवर रोखण्याचे लक्ष्य ठेवून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही सिल्वा यांनी सांगितले. गोव्याचे हित, लोकशाही आणि स्थिर सरकार या समान ध्येयासाठी समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ‘आप’ कटिबद्ध असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.





