
पणजी : लेखक आणि संशोधक युगांक नाईक लिखित ‘देश राग’ या कोंकणी नाटकाची ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित राष्ट्रीय रंगमहोत्सवासाठी निवड झाली आहे. भारत सरकारची नृत्य, नाटक आणि संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सांस्कृतिक संस्था असलेल्या संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीतर्फे १५ जुलै रोजी कालिदास जयंतीनिमित्त देशभर हा विशेष रंगमहोत्सव आयोजित करण्यात येत आहे. स्वातंत्र्यलढ्यावर आधारित विविध भारतीय भाषांतील निवडक नाटकांचे प्रयोग या महोत्सवात सादर होणार आहेत.
गोव्यातून निवड झालेले ‘देश राग’ हे नाटक गोव्याचे पहिले हुतात्मा बाळा राय मापारी यांच्या जीवनावर आणि १९५३-५४ या काळातील गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. संशोधनाधिष्ठित लेखन आणि युवा कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे या नाटकाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कला अकादमीच्या ५०व्या राज्य नाट्यस्पर्धेत या नाटकाला सर्वोत्कृष्ट मौलिक संहितेचा पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत या नाटकाचे सात प्रयोग सादर झाले असून, १८ जून गोवा क्रांती दिनानिमित्त रवींद्र भवन, सांखळी येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
संगीत नाटक अकादमीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या विशेष प्रयोगासाठी संपूर्ण निर्मितीची पुनर्रचना करण्यात येत असून, सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचे वय ४० वर्षांखालील असणे अनिवार्य आहे. त्यानुसार या नाटकात ७५ कलाकार आणि ३० तंत्रज्ञांचा युवा चमू सहभागी होत आहे. या नाटकाचा विशेष प्रयोग १५ जुलै रोजी सायंकाळी ६.00 वाजता कला अकादमी, पणजी येथे होणार असून, गोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाकडे या महोत्सवाच्या राज्यस्तरीय समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
इतिहासाचा सखोल अभ्यास, गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे वास्तवदर्शी चित्रण आणि युवा पिढीच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘देश राग’ हे नाटक राष्ट्रीय स्तरावर गोव्याच्या रंगभूमीचे प्रतिनिधित्व करणार आहे.







