ब्लू डार्ट’तर्फे ड्रोनच्या मदतीने डिलिव्हरीची सुरुवात
दक्षिण आशियातील आघाडीची कुरिअर आणि एकात्मिक एक्सप्रेस पॅकेज वितरण कंपनी ब्लू डार्ट’ने ड्रोन तंत्रज्ञानातील अग्रगण्य नाव, स्काय एअरच्या साथीने यशस्वीरित्या ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू केली. ही महत्त्वपूर्ण घडामोड स्वच्छ तसेच अधिक कार्यक्षम डिलिव्हरी पर्याय अधोरेखित करणारी आहे. सप्टेंबर 2021 मध्ये हैदराबादच्या विकाराबाद येथील त्यांच्या अग्रगण्य VLOS चाचण्यांच्या आधारे आणि तेलंगणा सरकारच्या ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ उपक्रमांतर्गत BVLOS चाचण्यांच्या आधारे, ब्लू डार्ट लॉजिस्टिक्ससाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर आहे.
सुरुवातीला वाढत्या ई-कॉमर्स क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून, हा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन शेवटच्या मैलापर्यंत क्रांतिकारी डिलिव्हरीसाठी सज्ज आहे. या सेवेमार्फत शिपमेंटची डिलिव्हरी त्याच दिवशी देण्यात येते, ज्यामुळे डिलिव्हरीची वेळ लक्षणीयरित्या घटते आणि पर्यावरणावरही फारसा परिणाम होत नाही. ब्लू डार्टच्या शाश्वत लॉजिस्टिक पद्धतींबद्दलच्या वचनबद्धतेवर आधारलेली ही देदीप्य कामगिरी जागतिक पर्यावरण दिनी जुळून आली, हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल.
या उपक्रमावर बोलताना ब्लू डार्ट’चे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफर मैनुअल म्हणतात, “भारतातील लॉजिस्टिक क्षेत्र एक उत्साहवर्धक टप्पा अनुभवत आहे. देशाची वेगवान आर्थिक वाढ आणि ग्राहक आकांक्षा यांचा परस्पर संबंध आहे. त्याचप्रमाणे टियर 2 आणि 3 शहरांच्या क्रयशक्तीला प्रचंड चालना मिळाली. मागणीत झालेली वाढ कार्यक्षमता आणि शाश्वतता सुनिश्चित करताना विकासाला चालना देणाऱ्या नाविन्यपूर्ण उपायांच्या गरजेवर भर देते. आम्ही ड्रोन तंत्रज्ञानाचा चमत्कार पाहत असताना, पुढील टप्प्यात आमच्या भागीदारांसमवेत अतिरिक्त पिन कोड समाविष्ट करण्याच्या योजनेसह ही सेवा अधिकाधिक विस्तारण्याची आम्ही उत्सुकतेने अपेक्षा करतो.”
चार दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या समृद्ध वारशासह, ब्लू डार्ट’ने एक्सप्रेस लॉजिस्टिक उद्योगात विश्वासार्हता, लवचिकता आणि प्रतिसादात्मकतेचे मानक निश्चित केले आहे. ड्रोन डिलिव्हरी कामकाजाची यशस्वी सुरुवात उद्योगातील पथप्रदर्शक म्हणून ब्लू डार्टचे स्थान आणखी मजबूत करते.