ग्रामीणांची बदलती जीवनशैली
– डॉ. सुधीर रा. देवरे
नागपूरच्या विजय प्रकाशनाकडून ‘गावदवंडी’ व ‘डोंगरदेव’ ही दोन लोकसंस्कृती विषयक पुस्तकं एवढ्यात प्रकाशित झालीत. पैकी ‘गावदवंडी’ पुस्तकातील मनोगत…
‘गावदवंडी’ या पुस्तकातून ग्रामीणांची बदलती जीवनशैली या विषयावर आपल्याशी हितगुज करायचे आहे. गावकुसाचे होत गेलेले स्थित्यंतर इथे अधोरेखित केले आहे. (लेखांमध्ये विशिष्ट परिसरातल्या गावांचा- अहिराणी पट्ट्यातला- उल्लेख जास्तकरून येत असला तरी सगळ्याच लेखांत कोणत्याही भौगौलिक क्षेत्रातल्या गावांचे प्रतिबिंब दिसावे.) गावातले केवळ भौतिक बदलच इथे नोंदवले नाहीत तर अभौतिक बदलांची दखलही लेखांत घेतली गेली. कालच्या गावांचा आज भौतिक बदल झाला तो ग्रामीण लोकांच्या मानसिकतेमुळे. मानसिकता स्थिर असली तर लोकांच्या वस्तुंचा भौतिक बदल होत नाही. अनुकरणातूनही भौतिक बदल होत असतात. आज शहरी अनुकरणातून ग्रामीण भागात भौतिक बदल झपाट्याने होत आहेत. असे मोठ्या प्रमाणात भौतिक बदल होण्याचे कारण मानवाची दिवसेंदिवस सुखाकडे जाण्याची धडपड. ती योग्य आहेच. तरीही सगळ्यात शेवटी राहून गेलेल्या माणसाची स्थिती आणि परिस्थिती यांचाही धांडोळा आवश्यक ठरतो.
हा गावकुसाच्या स्थित्यंतराचा विषय भावनिक असल्याने या पुस्तकाचा विषय वाचकांना रसपूर्ण व वाचनिय वाटेल. आज शहरात वास्तव्य करणारे बहुतांश लोक ग्रामीण भागातून आलेले आहेत. आपले कालचे गाव, गावातली घरे, गावाजवळचे शिवार, गावमित्र हे आपल्या काळजात रूतून बसलेले असतात. गावाशी जोडलेली नाळ तुटता तुटत नाही. आठवणीतले साधेसुधे गाव आज शहराकडे झुकलेले दिसत असले तरी बालपणातले गाव आपल्या डोळ्यापुढे जसेच्या तसे उभे राहते.
हे चित्रण जुने असले तरी याचा अर्थ असा नाही की आजच्या नव्या तरूण पिढीला गावाबद्दल काही जाणून घ्यायचे नाही. आपले वाडवडील खेड्यात कसे जीवन व्यतीत करत होते हे जाणून घेणे आजच्या तरूण पिढीलाही गरजेचे वाटते. म्हणून गतकाळात रमता येईल इतक्या वयाचा कोणी माणूस असो की वीस पंचवीस वर्षाचा तरूण, सर्वच जण काही विशिष्ट काळ का होईना गावाच्या स्मरणरंजनात रमून जातात. पण या पुस्तकात केवळ स्मरणरंजन आलेले नाही. यापेक्षा अनेक वस्तुनिष्ठ गाभ्याचा विचार या पुस्तकात केला आहे.
अमूक हा माझा प्रांत, अमूक ही माझी भूमी, अमूक ही माझी जन्मभूमी, अमूक ही कर्मभूमी आणि अमूक मातृभाषा अशा कप्यात आपण आपल्या जीवनातल्या गावांची- परिवेशाची (आणि शहरांचीही) वर्गवारी करीत असतो. ज्या गावात आपले बालपण गेले; किशोरपणाची ज्या गावात जडणघडण झाली; शिक्षणाचे गाव, कर्मभूमीचे गाव वगैरेंची आपल्या नेणिवेत नोंद घेतली जाते. आपल्या जाणिवा आज बदलल्या असल्या तरी प्रत्येकाला बालपणीच्या जीवन जाणिवा खुणावत असतात. प्रत्येक माणूस आठवणी लिहीत नसला, विशिष्ट दृष्टिकोनातून आपल्या हरवलेल्या गावाचा कायम विचार करत नसला तरी मधूनच तो आपल्या हरवलेल्या गावाचे मनन- चिंतन करतो. आपल्या गावाचे कुणाकडे तरी वर्णन करतो. कुणाकडे तरी बालपणीच्या आठवणी बोलून दाखवतो. आदी बाबी म्हणजेच आपली आपल्या गावाशी जुळलेली नाळ. म्हणून आपल्या बालपणापासून तर आतापर्यंतची गावाच्या स्थित्यंतराची काही निरिक्षणे नोंदवणे ही आपली मानसिक गरज असते. जो कोणी अशा गोष्टींची दखल घेत नाही असे लोक खूप विरळा. मागील तीस- चाळीस वर्षांचा कालखंड जरी विचारात घेतला तरी ही स्थित्यंतरे ठळकपणे दिसतात.
या काळातील गावाची रचना, ग्रामीण वासियांचा पेहराव, निवासस्थाने (घरे), शेती, वाहने- प्रवास, करमणूक, विधी- लग्नसोहळे, भाषा, वाद्य, ग्रामीण राहणीमान, ग्रामीण आहार, लोकपरंपरा, लोकवाड्.मय, चावडी, गावाची शिव- दर्जा- देवडी, गावातली दवंडी, भटके लोक, श्रध्दा, लोककलाकार, मागणारे लोक, अलुते- बलुते, समाज व्यवस्था, धर्मशाळा, झोका, बार, सण, उत्सव, बाजार, ग्रामीण दैवते, आदिवासी दैवते, जत्रा, लोकरहाटी, आड, नदी, सांस्कृतिक गाव, मुलामुलींची नाव ठेवण्याची रीत, ग्रामीण पर्यावरण, ग्रामीण मापे- परिमाणे, वेळ आणि अवकाश आदी ठळक बाबी या पुस्तकाच्या माध्यमातून उपयोजित झाल्या आहेत. पुस्तक वाचताना आपल्याला या आठवणी आपल्या गावी घेऊन जातील याची शाश्वती वाटते.
‘गावदवंडी’ हा ग्रंथ म्हणजे लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथार्थ दर्शन. ग्रामीण वस्तू- वास्तू, राहणीमान, बाजार, जत्रा, सण, उत्सव, करमणूक, वाहने, विधी, दैवते, लोकभाषा, वाद्य, आहार, पेहराव आदींचे लक्षवेधी निरिक्षणे इथे नोंदवली आहेत. प्रत्यक्ष गावाचे दर्शन घडेल अशी लेखांची शैली मुद्दाम सहज सोपी केली आहे. ग्रामीण विषयांची मांडणी करताना अनुभव अनुभूतीतून आल्याने साहजिकच संवेदनशील चिंतनशीलता आलेली आहे. ग्रामीणतेच्या वस्तुनिष्ठ गाभ्याचा विचार संपृक्तपणे या ग्रंथात उपयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्या लिखाणाकडे केवळ उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे चित्रण- चिंतन म्हणून पाहता येणार नाही; तर स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून भारतातील कोणत्याही ग्रामीण प्रदेशाचे प्रतिबिंब या लिखाणात दिसावे. दिवसेंदिवस ग्रामीण जीवन कसे ग्लोबल होत चालले, असा ठळक निष्कर्षही अधोरेखित होतो. समाजकारण, शिक्षण, प्रबोधन, पर्यावरण, कला, भाषा, साहित्य, लोकश्रध्दा, परिमाणे आदी अंगांचाही सखोल विचार या ग्रंथातून केला आहे. ग्रामीण समाज आणि त्यांचे सहज सहजीवन टिपण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसंस्कृतीचे जतन केले तर लोकभाषा प्रवाहीत राहते, असे या ग्रंथाचे एकूण सूत्र आहे.
गावात परंपरेने कारू- नारू लोक असत. कारू लोकांनाच बलुतदार असे दुसरे नाव होते. तर नारूंना आलुतदार म्हणूनही ओळखले जायचे. बारा प्रकारच्या जाती ह्या कारू असायच्या तर नारूंची संख्या अठरा जातीत होती. अलुते- बलुते (बारा कारू वा बलुतदार) म्हणजे काय हे नीट लक्षात येण्यासाठी त्या लोकांची यादी पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट एक मध्ये मुद्दाम दिली आहे. लोकजीवन आणि आदिवासी- ग्रामीण लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांना, संशोधकांना हे पुस्तक नक्कीच योग्य वाट दाखवेल अशी आशा आहे.
…