
कृष्णा नाईक हत्याप्रकरणी सर्व आरोपींना तातडीने अटक करा : काँग्रेस
पणजी : कोलवाळ येथे २४ जून रोजी ६० वर्षीय कृष्णा नाईक यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तातडीने अटक करून प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केली आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या घटनेचा निषेध केला. या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पणजीकर यांच्या म्हणण्यानुसार, प्रसारमाध्यमांतील वृत्ते आणि उपलब्ध माहितीनुसार परिसरात दुचाकीवरून उपद्रव करणाऱ्या काही युवकांना कृष्णा नाईक यांनी जाब विचारल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना बाहेर बोलावले आणि लाकडी दांडके व इतर बोथट वस्तूंनी मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला. या हल्ल्यात हस्तक्षेप करण्यासाठी आलेल्या काही शेजाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
गंभीर जखमी अवस्थेत कृष्णा नाईक यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून कटकारस्थानाचा सखोल तपास करण्यात यावा, दोषींवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी तपास व खटल्याची प्रक्रिया जलदगतीने राबवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
पणजीकर यांनी कृष्णा नाईक यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत न्यायासाठीच्या लढ्यात काँग्रेस त्यांच्यासोबत राहील, असे म्हटले आहे.







