
पर्वरी, आल्दोना काँग्रेस ब्लॉकसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
पणजी :
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने (जीपीसीसी) उत्तर गोव्यातील पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा केली आहे.
जीपीसीसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, अनिल पेडणेकर यांची पर्वरी ब्लॉक काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पर्वरी ब्लॉकचे विद्यमान अध्यक्ष मारिओ जे. अटाईड यांची उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, सागर सालगावकर यांची आल्दोना ब्लॉक काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांना जीपीसीसीचे कार्याध्यक्ष आणि आमदार कार्लोस अल्वारेस फेरेरा यांनी मान्यता दिली आहे.
नवीन पदाधिकारी पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी, जनसंपर्क वाढविण्यासाठी आणि राज्यभर पक्षाच्या कार्यक्रमांना गती देण्यासाठी कार्य करतील, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.







