विश्व कोंकणी केंद्र : कोंकणी जनतेचे पवित्र मंदिर
– उदय नरसिंह म्हांबरो
“विश्व कोंकणी समारोह” कर्नाटकातील मंगळुरु शहरात आज आठ फेब्रुवारी आणि उद्या नऊ फेब्रुवारी असे दोन दिवस मोठ्या दिमाखाने साजरा होत आहे. हा महोत्सव विश्व कोंकणी केंद्रातर्फे आयोजित केला जात आहे. गोवा विद्यापिठ, मंगळुरु विद्यापिठ तसेच कविता ट्रस्ट यांचा महोत्सवाला सहयोग लाभला आहे. वेगवेगळ्या विषयावरील परिसंवाद, चर्चासत्रे, गोलमेज परिषद, संगीत आदि भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा, महाराष्ट्र तसेच केरळमधून जवळपास दिडशे ते दोनशे प्रतिनिधी तसेच कर्नाटकातून भरपूर उपस्थिती ह्या समारोहाला लाभेल अशी अपेक्षा आहे.
ह्या केंद्राची मुळ संकल्पना विश्व कोंकणी सरदार बस्ती वामन शणै यांचीच. गेल्या वर्षी दोन जानेवारी रोजी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ विश्व कोंकणी केंद्राच्या प्रवेशद्वारी बस्ती वामनांचा पुर्णाकृती पितळी धातुचा पुतळा बसविण्यात आला आहे. ह्या पुतळ्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज आठ तारखेला संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.
६ नोव्हेंबर १९३४ साली बंटवाल गावात जन्म झालेले बस्ती वामन शणै सुरुवातीला सिंडिकेट बॅंकेत नोकरीला होते. सुरुवाती पासूनच ते कोंकणी चळवळीशी निगडीत होते परंतू १९९२ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेवून त्यांनी पुर्णपणे कोंकणीच्या सेवेला वाहून घेतले. ते कर्नाटक कोंकणी भाषा मंडळाचे कांही काळ अध्यक्ष होते. कोंकणी घटनेच्या आठव्या परिशिष्ठात समाविष्ठ व्हावी यासाठी देखिल त्यांनी काम केले. कर्नाटकात कोंकणी अकादमी स्थापन व्हावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला व त्याची परिणती म्हणून कर्नाटक सरकारने कर्नाटक कोंकणी अकादमी स्थापन केली. त्यांनी पुढाकार घेवून १९९५ साली १६ डिसेंबर ते २२ डिसेंबर पर्यंत चाललेल्या पहिले जागतिक कोंकणी अधिवेशन यशस्वी करुन दाखवले. सुमारे पांच हजार प्रतिनिधीनी विश्वभरातून ह्या संमेलनात भाग घेतला. याच अधिवेशनात विश्व कोंकणी केंद्राची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करताना कोंकणी जनसमुदायातर्फे त्यांना ‘विश्व कोंकणी सरदार’ हा किताब बहाल करण्यात आला.
केंद्राच्या फंड उभारणी पासून ते प्रकल्प पुर्णत्वाला नेईपर्यंत बस्तीमामानी कधी तसूभर सुद्धा विश्रांती घेतली नाही. केरळ, कर्नाटकाबरोबरच गोवा महाराष्ट्रातील कोंकणी समुदायाकडे त्यांचा फार जवळचा व जिव्हाळ्याचा संबंध होता. ते स्वत: निगर्वी, निस्वार्थी व प्रामाणिक होते. त्यांचे राहणीमान एकदम साधे होते. केंद्राच्या कुठल्याही वस्तुचा त्यांनी कधी वैयक्तिक लाभ घेतला नाही. त्यामुळे कर्नाटकातील दयानंद पै, टि. वि. मोहनदास पै तसेच इतर अनेक दानशूर कोंकणी धनिक व उद्योगपतींनी त्यांच्या हाकेला भरघोस प्रतिसाद देवून विश्व कोंकणी केंद्राच्या उभारणी साठी फंडाची कमतरता भासू दिली नाही.
स्थलांतरीत झालेल्या कित्येक कोंकणी कुटुंबांतील आजच्या पिढीतील वंशजांनी कर्नाटक व केरळच्या परप्रांतात आज स्वत:चे उद्योग व्यवसाय उभारले आहेत. हे मुळचे गोमंतकीय आज साहित्य, कला, शिक्षण व उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहेत. परंतू वेगवेगळ्या गावांमधून विखुरलेले आहेत. अश्या सर्व कोंकणी समाजाला एका व्यासपीठावर आणून पुर्ण कोंकणी समाजाची आर्थिक व सामाजिक उन्नती करण्याचे विशाल स्वप्न बस्ती वामन यांनी पाहिले व ते प्रत्यक्षातही आणले.
कोंकणी भाषा, साहित्य, संगीत, नाटक व संस्कृतीच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या ह्या संस्थेचा कारभार पुढे नेताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. कर्नाटक राज्याची राज्यभाषा कानडी. राज्यात कोंकणी समाज अल्पसंख्यांक. सगळीकडे कानडीची सक्ती. तरी त्यांनी कोंकणी भाषिक अधिकारी, राजकारणी, उद्योगपती यांना मातृभाषेचे महत्व पटवून कोंकणी समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या अंगी असलेल्या निस्वार्थी वृत्तीमुळेच त्यांना हे शक्य झाले.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती टि. वि. मोहनदास पै यांनी जेव्हा उद्योजक प्रदिप पै व इन्फोसिसचे रामदास कामत यांच्या सोबत केंद्राला प्रथम भेट दिली तेव्हा बस्तीमामांच्या कार्याचा धडाका पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी लगेच आपल्या मातोश्री श्रीमती विमला वि. पै यांच्या नावाने कोंकणी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सोय व्हावी यास्तव केंद्राच्या प्राकारात वसतिगृह सुरु केले. मागील अकरा वर्षात त्यांनी करोडो रुपये शिष्यवृत्तीच्या रुपाने विद्यार्थ्यांना सहाय्य केले आहे. या योजनेचा आजवर बारा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. शिष्यवृत्तीचा लाभ घेवून आपले उच्च शिक्षण पुर्ण केलेले असे हजारो विद्यार्थी इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रांस अश्या जगभरातील विविध देशात आपले नोकरी व्यवसाय करतात. भारतात इन्फोसिस, टि.सी.एस, विप्रो सारख्या नामाकित कंपनीत उच्च पदावर काम करतात. आणि तरीही विश्व कोंकणी केंद्राच्या वेगवेगळ्या उपक्रमात व कार्यक्रमात सहभागी होतात. स्वयंसेवक म्हणून काम करतात. विश्व केंद्राच्या कार्यकारिणीवर सुद्धा कांही माजी विद्यार्थांना घेण्यात आले आहे. विश्व केंद्राची खरी ताकद ह्या युवा वर्गात आहे. आणि युवावर्गाला एकसंघ बांधून घेण्यात केंद्राचे प्रमुख अधिकारी गुरुदत्त बालीगा यांचा महत्वाचा वाटा आहे. केंद्राच्या उभारणीपासून आजवर सातत्याने विद्यार्थ्यांना आईची माया देणारी सहाना किणी हिचेहि योगदान तितकेच मोलाचे.
तसेच कोंकणी साहित्य, नाटक, सामाजिक काम अश्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या कोंकणी विद्वानांचा पुरस्काराने गौरव केला जातो. हे पुरस्कार विमला पै पुरस्कार व बस्ती वामन पै पुरस्कार या नांवाने सुपरिचित आहेत. यंदा हे पुरस्कार नऊ तारखेला प्रदान केले जाणार आहेत.
विश्व कोंकणी केंद्र हे कोंकणी जनतेसाठी एक पवित्र शारदेचे मंदिर आहे. इथे दोन सुसज्ज वाचनालये आहेत. एक वातानुकुलीत सभागृह आहे. पुरातन कोंकणी संस्कृतीची ओळख घडवणारे संग्रहालय आहे. दररोज वेगवेगळे कार्यक्रम छायाचित्रित करुन ते युट्युबवर प्रसारीत करणारा सुसज्ज डिजिटल स्टुडिओ आहे. विद्वान, साहित्यिक, उद्योगपती, वैज्ञानिक, सैनिक, नाट्यकलाकार, राजकारणी अश्या विविध क्षेत्रात नंवलौकीक मिळवलेल्या कोंकणी समाजातील नामवंत व्यक्तींची तैलचित्रे असलेला हॉल ऑफ फेम आहे. इथेच आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. तसेच केंद्राचे अध्यक्ष नंदगोपाळ शणै यांनी एक कोटी रुपये दान करुन त्यांच्या पुर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीमती इंदिरा व गंडाय लक्ष्मण पै श्रेष्ठता केंद्र तसेच श्रीमती सीता आणि दर्बे रमानाथ नायक सभागृह बांधले आहे. त्याचेही उद्घाटन ह्या प्रसंगी होणार आहे.
बस्ती वामन शणै ह्या पुण्यात्माने विश्व कोंकणी केंद्रासारखी पवित्र वास्तू तर उभारलीच पण आपल्यामागे हे कार्य निर्विघ्नपणे चालू राहावे यासाठी आपल्यासारखेच शेकडो कोंकणी सरदार तयार केले. विद्यार्थ्यांची शक्ती ओळखून त्यांच्यासाठी साधनसुविधा निर्माण करतानाच नवीन पिढीला मातृभाषेची गोडी लावली.
पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीचा बळी ठरलेले हे कोंकणी बांधव पिढ्यानपिढ्या जरी परराज्यात स्थायिक झालेले असले तरी त्यांनी स्वत्व सोडले नाही. त्यांचा हा आदर्श घेण्यासारखा. कोंकणी बरोबरच गोवा व गोमंतकीयां विषयी त्यांना फार आपुलकी व आदर आहे.
गोव्यातून कुणीही साहित्यिक किंवा कोंकणीप्रेमी मंगळुरला गेला कि विश्व कोंकणी केंद्रातर्फे त्यांची शाही बडदास्त ठेवली जाते. गोंयकारांनी मंगळुरात येवून विश्व कोंकणी केंद्राला भेट द्यावी, केंद्राने सुरु केलेले कोंकणी संबधित प्रकल्प पहावे, केंद्राच्या कामात सहभागी व्हावे यासाठी ते आग्रही आणि प्रयत्नशील असतात. विश्व कोंकणी केंद्राचे नुतन अध्यक्ष नंदगोपाळ शणै एक यशस्वी उद्योजक व चार्टर्ड अकावंटंट. तरी ते केंद्रासाठी आपला अमुल्य वेळ खर्ची घालून बस्ती वामनांचा हा वारसा आजही तितक्याच मेहनतीने पुढे जोपासत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत ह्या किर्तीमंदिराची यशोगाथा अशीच उत्तरोत्तर वाढत राहो हीच सदिच्छा.
(गोवन वार्ता मध्ये पूर्व-प्रकाशित)