
गोवा फॉरवर्डने केली अल्पसंख्याक विभाग आणि ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती
पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षाने संघटन बळकटीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत राज्यातील सात विधानसभा मतदारसंघांसाठी अल्पसंख्याक ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. तसेच कादर शाह यांची पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या मान्यतेनंतर या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. संघटनात्मक सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
नियुक्त करण्यात आलेल्या अल्पसंख्याक ब्लॉक अध्यक्षांमध्ये सांगे मतदारसंघासाठी जाबीर खान, मुरगावसाठी हमीद शेख, शिरोड्यासाठी सोहेल शेख, फातोर्ड्यासाठी शरफोद्दीन झेक, मयेसाठी अयान साब, कुंभारजुवेसाठी रियाज अहमद आणि काणकोणसाठी फारूक खान यांचा समावेश आहे.
याशिवाय कादर शाह यांची पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रभारीपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील विविध समाजघटकांमध्ये पक्षाची पोहोच वाढविणे आणि तळागाळातील संघटन अधिक सक्षम करणे, या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. अल्पसंख्याक समाजातील नेतृत्वाला बळ देण्याच्या व्यापक धोरणाचा हा भाग असल्याचेही पक्षाच्या सूत्रांनी नमूद केले.







