
गोवा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षांचे निलंबन; राज्य समितीही बरखास्त
पणजी : अखिल भारतीय काँग्रेस समितीने गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांच्यावर शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पदच्युत केले आहे.
एआयसीसीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तसेच खासदार इम्रान प्रतापगढी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, वसीम खान यांना गोवा प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

याचबरोबर, गोवा प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची संपूर्ण राज्य समितीही पुढील आदेशापर्यंत बरखास्त करण्यात आली आहे.
दरम्यान, अल्पसंख्याक विभागाचे कामकाज सुरळीतपणे चालविणे आणि नव्याने संघटनात्मक पुनर्रचना करण्यासाठी नझीर ए. खान यांची गोवा प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या संयोजकपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षातील शिस्त अबाधित ठेवणे आणि गोव्यातील संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले संयोजक अल्पसंख्याक विभागाचे कामकाज पाहतील तसेच एआयसीसीच्या निर्देशांनुसार नवीन समितीच्या पुनर्गठनाची प्रक्रिया पूर्ण करतील.






